
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा-ओबीसी आरक्षण, शेतपंपांची तोडलेली वीज, आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा विविध मुद्यांवरून सरकारला जाब विचारण्यात येईल. त्याशिवाय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात येईल. त्यासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर आयोजित विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची घोषणा त्यांनी केली.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक, ओबीसी-मराठी आरक्षण, वाईन विक्रीची परवानगी, शेतकरी कर्जमाफी, वीज कापण्याच्या घटना अशा मुद्यांवर सरकारला घेरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही
वीज जोडणी कापण्याच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ग्रामीण भागात शेतकऱयांच्या वीज पंपाची जोडणी कापण्यात येत आहे. शेतकऱयांची वीज कापणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात केली होती. पण तरीही वीज कापण्याचे प्रकार सुरू आहेत. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही, असा टोला त्यांनी लगावला.





























































