
अवघ्या टेनिस विश्वाचे लक्ष असलेल्या विम्बल्डन स्पर्धेचा थरार सोमवार, 3 जुलैपासून रंगणार असून यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत 23 वेळा विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला अव्वल नव्हे तर द्वितीय मानांकन देण्यात आले आहे तर स्पेनचा 23 वर्षीय कार्लोस अल्काराझला अव्वल मानांकन लाभले आहे. त्यामुळे अल्काराझच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल.
विम्बल्डन आयोजक ऑल इंग्लंड क्लबने यंदाच्या व्यावसायिक टेनिस असोसिएशन (एटीपी) महिला टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) क्रमवारीला प्राधान्य दिले आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अल्काराझ आणि चार वेळा महिला एकेरी ग्रँडस्लॅम विजेती 22 वर्षीय पोलंडची इंगा स्वीटेकला सर्वोच्च मानांकन देण्यात आले आहे.
अल्काराझ जागतिक क्रमवारीत अव्वल
फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचने विक्रमी 23 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तो इतर स्पर्धांत खेळला नाही. तर अल्काराझ अलीकडेच क्वीन्स क्लब स्पर्धा जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. सोमवारी त्याने जोकोविचला प्रथम क्रमांकावरून हटवले. त्यामुळे जोकोविचची दुसऱया स्थानी घसरण झाली आहे. गेल्या वेळी विम्बल्डनमध्ये रशियन आणि बेलारूस खेळाडूंवर बंदी घातल्यामुळे एटीपी आणि डब्ल्यूटीएने रँकिंग गुण दिले नाहीत. ज्यामुळे गतविजेत्या जोकोविचला फायदा झाला नाही.






























































