
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल’, ‘घर में दारू महेंगा तेल’,‘फडणवीस सरकारचा निषेध असो’, ‘फडणवीस सरकार होश में आओ’ अशा घोषणा देत आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरच ठिय्या दिला होता. चॅनेलचे कॅमेरे सरसावताच विरोधकांना आखणीनच स्फुरण चढत होते. भाजपचे एकनाथ खडसे व अनिल गोटे यांचे आगमन होताच विरोधकांनी घोषणांचा सूर बदलत ‘ये अंदर की बात है, खडसे-गोटे हमारे साथ है’, ‘ख़डसे आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा सुरू करताच भाजपला पळता भुई थोडी झाली..
फडणवीस सरकारच्या विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. तेवढ्यात भाजपचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे प्रसन्न चेहऱयाने पायऱयांजवळ आले. खडसे यांना बघताच विरोधकांनी घोषणांचा सूर अचानक बदलला आणि ‘ये अंदर की बात है, खडसे हमारे साथ है’, ‘खडसे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा सुरू करताच खडसे यांच्या चेहऱयावरील हसू मावळले. विरोधकांना कसेबसे हस्तांदोलन करीत विधान भवनात प्रवेश केला. त्यानंतर भाजपचेच अनिल गोटे आले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देण्याची घोषणा केली होती त्याचा धागा पकडत विरोधकांनी पुन्हा एकदा ‘ये अंदर की बात है, अनिल गोटे हमारे साथ हैं’ अशी घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे मंत्री व आमदारांचा प्रवेश होताच विरोधी सदस्यांना अधिकच चेव चढत होता. आमदार आशीष शेलार व शिक्षणमंत्री विनोद तावडे येताच विरोधकांनी ‘बघता काय, सामील व्हा’ अशी घोषणाबाजी केली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळातील पक्षनेते अजित पवार आदींनी विधान भवनाच्या पायऱयांवर ठिय्या दिला होता. ‘दुष्काळाची पोकळ घोषणा नको, ठोस उपाय करा’, ‘शेतकऱयांना तत्काळ आर्थिक मदत द्या’, ‘प्यायला नाही पाणी आणि आश्वासनांची वाणी’, ‘मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण द्या’ असे फलक दाखवत विरोधी पक्षांचे आमदार पायऱ्यांवर बसले होते. बराच वेळ घोषणाबाजी सुरू होती. कामकाज सुरू होण्याची बेल होताच विरोधक सभागृहाच्या दिशेने रवाना झाले.


























































