दरोडय़ाचा बनाव; पत्नीनेच पतीचा खून केल्याचे निष्पन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेलापूर-उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात नईम रशीद पठाण या बॅटरी व्यावसायिक तरुणाचा दरोडय़ावेळी खून केल्याची घटना घडली होती. पत्नीनेच पतीच्या अत्याचाराला कंटाळून दरोडय़ाचा बनाव करीत गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी नईमच्या पत्नीला अटक केली आहे.

बुशरा नईम पठाण (वय 27) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. बेलापूर येथील नईम पठाण याच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेतानाच नईम पठाण यांचा खून केला. नईम यांच्या पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आली असून, त्या गंभीर जखमी आहेत. दरोडेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, दरोडेखोर आले याचा काही मागमूस पोलिसांना मिळाला नाही. शिवाय इतक्या रात्री बुशराने बंगल्याचा दरवाजा का उघडला? याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरविली. पोलिसांनी नईमची पत्नी बुशरा हिची चौकशी केली. त्यावेळी तिने दरोडय़ाचा बनाव करून आपणच खून केल्याची कबुली दिली. पती नईन अनैसर्गिक कृत्य करून तिचा छळ करीत असे. त्यामुळे तिने त्याला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन नंतर खिडकीला साडी बांधून त्याच्या साहाय्याने गळा आवळल्याची कबुली दिली. पोलिसांनी आज सकाळी तिला ताब्यात घेतले.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह सहायक फौजदार बाळासाहेब मुळीक, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, रवींद्र कर्डिले, सागर ससाने आदींनी केली.