
केरळमधील एका महिलेने प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल या तिच्या आई असल्याचा दावा केला आहे. या महिलेने पौडवाल यांच्याविरोधात थिरुवनंतपुरम जिल्हा कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल केला असून तिने 50 कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
कर्मा मॉडेक्स असे त्या महिलेचे नाव असून तिला एका दाम्पत्याने ती चार दिवसांची होती तेव्हा दत्तक घेतले. कर्माच्या दत्तक वडिलांनी तिला मृत्यूपूर्वी ती अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचे सांगितले आहे. ‘अनुराधा पौडवाल यांनी मी अवघ्या चार दिवसांची असताना मला दुसऱ्या दाम्पत्याला दत्तक दिले. त्यांना त्यावेळी करिअरकडे लक्ष द्यायचे होते त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ केला नाही’, असा दावा या महिलेने केला आहे.
दरम्यान पौडवाल यांनी तिला सांभाळले नाही असा आरोप करत कर्माने त्यांच्याकडे 50 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील मागितली आहे. ‘त्यांनी मी 4 दिवसांची असताना दुसऱ्या व्यक्तीला सांभाळायला दिले. त्यांचे हे सिक्रेट मला माझ्या वडिलांकडून समजले आहे. माझा दावा सिद्ध करण्यासाठी मी डिएनए चाचणी करायला देखील तयार आहे. जर सिद्ध झालं तर त्यांनी मला 50 कोटी रुपये तसेच त्यांचे पती अरुण पौडवाल यांच्या संपत्तीतील माझा हिस्सा द्यावा’ असा दावा कर्माने केला आहे.



























































