
फसवणूक प्रकरणात हरियाणातून अटक करून पुण्यात आणत असताना महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांचे पथक तिला घेऊन येत होते. राजस्थानातील कोटा जवळील नागदा स्टेशन येथे सिग्नलिंग दरम्यान महिलेने पलायन केले.
सादिया सिद्दीकी (35) असे पळून गेलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सादिया हिच्यावर ऑनलाईन फसवणूकप्रकरणी शहरातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासावरून तिचा शोध घेतला. सादीया हरीयाणात असल्याचे समजल्यानंतर एक महिला अंमलदार आणि दोन पुरूष कर्मचारी असे तिघांचे पथक तिला आणण्यासाठी रवाना झाले. महिलेला अटक करून तिला पुण्यात आणण्यात येत होते.
दरम्यान, ट्रेन राजस्थानातील कोटा परिसरातील नागदा स्टेशन येथे सिग्नलिंगसाठी थांबली होती. त्यावेळी सादीया रेल्वेतून पळून गेली. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच सायबर पोलिसांच्या तावडीतून ससून रुग्णालयातून एक आरोपी पळून गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता ही दुसरी घटना उघडकीस आली आहे.


























































