
मुंबईहून एका महिलेचा मृतदेह तिचे कुटुंबीय उत्तर प्रदेशमध्ये नेत होते. तेव्हा प्रवासादरम्यान या महिलेचा मृतदेहच गायब झाला होता. तब्बल दोनशे किमी दूर असलेल्या मध्य प्रदेशच्या मेहरा स्थानकाजवळ रुळांवर या महिलेचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी रेल्वेवर हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप केला आहे. तसेच या मागे कुठलीतरी टोळी सक्रिय असल्याची भितीही व्यक्त केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. सरवारी शेख या 56 वर्षीय महिला मूळच्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या रहिवासी होत्या. त्यांचा मुलगा गुलफाम शेख भिवंडीत कापड गिरणीत कामाला आहे. गुलफाम शेख भिवंडीत आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहतात. सरवारी शेख यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यासाठी गुलफाम यांनी टाटा मेमोरीलय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईत आणले. जुलैपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरवारी शेख काही वेळ धारावीत आपल्या नातेवाईकांकडे राहत होत्या. परंतु रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नेणे गरजेचे होते. त्यासाठी शेख कुटुंबीयांनी सर्व कागदपत्रे जमा केली आणि रेल्वेकडे रीतसर परवानगी मागितली.
त्यानुसार शेख यांचा मृतदेह शवपेटीत ठेवण्यात आला. शेख यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह ट्रेनने नेण्याचा निर्णय घेतला. शेख यांचा मृतदेह पार्सल कंपार्टमेंट मध्ये ठेवण्यात आला होता. संपुर्ण कुटुंबीय जेव्हा उत्तर प्रदेशच्या प्रयागराजला पोहोचले तेव्हा गाडीत मृतदेह नसल्याचे कळाले. त्यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. जिथे जिथे गाडी थांबली होती तिथे मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर तब्बल 12 तास शोधा घेतल्यानंतर शेख यांचा मृतदेह 201 किमी दूर असलेल्या मध्य प्रदेशच्या मेहर स्थानकाजवळ रुळांवर पडलेला आढळला. या प्रकरणी शेख कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शवपेटीतून मृतदेह बाहेर पडला असावा असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. परंतु शेख यांच्या कुटुंबीयांना रेल्वेचा अंदाज फेटाळून लावला. शवपेटीत मृतदेह ठेवल्यानंतर स्क्रू लावून पेटी घट्ट बंद करण्यात आली होती. त्यामुळे मृतदेह बाहेर पडणारच नाही असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसेच प्रकरणात मृतदेह चोरणारी एखादी टोळी असावी असा संशय मृत महिलेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.



























































