चिवला बिचवर समुद्रात बुडणाऱ्या महिलेला स्थानिकांनी वाचवले

562
sunk_drawn_death_dead_pic

मालवणमधील चिवला बीच येथील समुद्रात पर्यटनाचा आनंद लुटत असताना दिल्ली येथील पर्यटकांपैकी कोमल गर्ग (वय 43) ही महिला पर्यटक बुडत असताना त्यांना स्थानिकांनी वाचवले आहे. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी कोमल यांना समुद्रातून बाहेर काढत शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोटात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील उपचारासाठी गोव्यात हलविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मालवण येथील चिवला बीच समुद्र किनारा सर्वात सुरक्षित मानला जातो. येथे समुद्री लाटांची तीव्रता कमी असते. समुद्रातील भूभागही खड्डेमय नाही. त्यामुळे या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दिल्ली येथील पर्यटकांचा एक समूह मालवणात पर्यटनासाठी आला होता. चिवला बीच येथे समुद्री पर्यटनाचा आनंद ते लुटत होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोमल आणि त्यांच्या सहकारी समुद्रात उतरल्या होत्या. समुद्री लाटांच्या मार्‍याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात ओढल्या गेल्या. त्यांना बुडताना पाहून स्थानिकांनी त्यांना किनार्‍यावर आणले आणि शहरातील लिमये रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

समुद्राचे पाणी पोटात गेल्याने कोमल यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. यावेळी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांनीही रुग्णालयात धाव घेत विचारपूस केली. पुढील उपचारासाठी कोमल यांना गोवा येथे हलविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या