मरण पावलेला ‘बलात्कारी’ जिवंत सापडला, न्यायालयाने ठोठावली शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बलात्कार करणाऱ्या एका माणसाला मृत घोषित केल्याने फाईल बंद करण्यात आल्याची आणि नंतर तो जिवंत सापडल्याची घटना बिहार इथे घडली आहे. पीडितेच्या आईच्या संशयावरूनच आरोपीला बेड्या पडल्या आहेत.

ही घटना गेल्यावर्षी उघड झाली होती. 2018मध्ये अल्पवयीन पीडितेवर नीरज मोदी नावाच्या शिक्षकाने बलात्कार केला होता. तेव्हापासून त्याला शिक्षा मिळावी म्हणून पीडितेच्या आईने सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्यावर्षी या महिलेला मोदी हा मरण पावल्याचं सांगण्यात आलं आणि हे प्रकरण बंद करण्यात आलं. पण, या महिलेला यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला.

नीरज मोदी हा घरीच मरण पावल्याचं सांगत त्याचे वडील राजाराम मोदी यांनी प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर सादर केलं. त्यात नीरज मोदी याचा चितेवरचा आणि राजाराम मोदी याचा ती चिता रचत असतानाचा फोटो, चितेची लाकडं खरेदी केल्याची पावती इत्यादी पुरावे सादर केले. जळलेल्या चितेचा फोटोही यासोबत जोडला. त्यानंतर न्यायालयाने नीरज मरण पावल्याचं जाहीर केलं.

पण, महिलेला या सगळ्याचा संशय आला. तिने गावच्या ग्रामपंचायतीकडे याची शहानिशा करण्यासाठी पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीकडे नीरज याचा बायोमेट्रिक क्रमांक राजारामने पोहोचता केला होता. त्यानंतर त्याच्या मृत्युचा दाखला जारी करण्यात आला होता. मात्र, महिलेने काही तार्किक प्रश्न विचारले आणि ग्रामपंचायतीने या प्रकरणाची शहानिशा करण्याचं ठरवलं. वास्तविक ग्रामीण भागात एखाद्याचा मृत्यू ही गुप्त बाब राहत नाही. तरीही नीरजच्या मृत्युविषयी कुणालाही काहीही ठाऊक नव्हतं. यात त्याच्या नातेवाईकांचाही समावेश होता. कारण, त्याच्या अंत्यसंस्कारावेळी कुणीही गेलं नव्हतं.

सर्वसाधारणतः घरात मृत्यू झाल्यानंतर त्याचे दशक्रिया विधी घातले जातात. बिहार सारख्या काही ठिकाणी कुटुंबीय केस देखील काढतात. नीरज मोदीच्या प्रकरणात यातलं काहीही करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे पंचायत सदस्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली आणि तपास सुरू केला. त्याच्या काही महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर 2022मध्ये नीरज पोलिसांसमोर शरण आला.

खोटी कागदपत्र दाखवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी नीरजचे वडील राजाराम याच्यावरही खटला दाखल करण्यात आला. बलात्काराच्या आरोपाखाली नीरजला चौदा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर, राजाराम मोदी याला अटक करण्यात आली असून त्यालाही शिक्षा होण्याची शक्यता आहे.