सेलच्या नावाखाली शॅम्पूची किंमत दुप्पट आकारली, महिलेने फ्लिपकार्टवर ठोकला दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बिलीयन डेज सेलच्या नावाखाली शॅम्पूची दुप्पट किंमत आकारल्याचे फ्लिपकार्टला भारी पडले आहे.  बेंगळुरुच्या एका महिलेने फ्लिपकार्टवर फसवणूकीचा दावा ठोकला आहे, ग्राहक न्यायालयाने महिलेच्या बाजूने निर्णय देत फ्लिपकार्टला 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सांगितले. फ्लिपकार्टवर अन्यायकारक कारभाराची टीका केली.

सौम्या पी असे त्या महिलेचे नाव आहे. सेल्सच्या जाहीरातीने प्रभावित होत सौम्या पी या महिलेने फोन पे च्या माध्यमातून 191 रुपयांची पतंजली केश कांति प्रोटीन हेअर क्लींजरची ऑर्डर दिली होती. 10 ऑक्टोबर 2019 ला तिला प्रोडक्ट मिळाल्यावर, तिला एमआरपी 95 रुपये असल्याचे समजले, जे कंपनीने आकारलेल्या किमतीपेक्षा खूपच कमी होते. तोच शॅम्पू फ्लिपकार्ट अॅपवर 140 रुपये होता, त्यात शिपिंगसाठी अतिरिक्त 99 रुपये आकारले गेले होते. सौम्याने दिलेल्या किंमती आणि उत्पादनाच्या लेबलवरील एमआरपीपेक्षा बरीच तफावत होती. फ्लिपकार्टच्या ग्राहक सेवेकडून तिला मिळालेल्या प्रतिसादामुळे निराश झालेल्या सौम्याने ग्राहक न्यायालयात धाव घेत कायदेशीर कारवाईचा मार्ग निवडला.

याप्रकरणी ग्राहक मंचाने फ्लिपकार्टच्या विरोधात निर्णय दिला आणि त्यांना शॅम्पूच्या बाटलीच्या कमाल किंमतीपेक्षा जास्त विकल्याबद्दल फ्लिपकार्टला दोषी ठरवण्यात आले. मंचाने म्हटले आहे की, शॅम्पूसाठी घेतलेली अतिरिक्त रक्कम 96 रुपये चा परतावा, सेवेतील कमतरतेसाठी सौम्याला 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. तसेच अनुचित व्यापार व्यवहारासाठी 5 हजार रुपयांचा अतिरिक्त दंड. याशिवाय सौम्याच्या न्यायालयीन खर्चासाठी 5 हजार रुपयांची भरपाई देण्यात यावी. एमआरपीची किंमत (MRP) ही सर्वोच्च कायदेशीर किंमत आहे ज्यावर ग्राहकांना उत्पादन विकले जाऊ शकते. यामध्ये सर्व करांचा समावेश असतो आणि तो निर्माता किंवा वितरकाद्वारे निर्धारित केला जातो. किरकोळ विक्रेत्यांना एमआरपीपेक्षा जास्त शुल्क आकारण्याची परवानगी नाही.