
सामना ऑनलाईन । भोपाळ
बसने प्रवास करताना खिडकीबाहेर डोके काढून उलटी करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. या महिलेसोबत झालेला अपघात इतका भयंकर होता की तिचे डोके धडापासून वेगळे होऊन रस्त्यावर पडले व तिचे रक्तबंबाळ शरीर बसमध्येच राहीले. आशा देवी असे त्या महिलेचे नाव असून ती मध्य प्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
आशा देवी (56) या शुक्रवारी साटना जिल्ह्यातून पन्ना जिल्ह्यात जाण्यासाठी बसने प्रवास करत होता. बस चालक हा अतिशय बेदरकारपणे बस चालत होता. त्यामुळे आशा देवींना उलट्यांचा त्रास होऊ लागला. उलटी करण्यासाठी त्यांनी खिडकीतून डोके बाहेर काढले. मात्र त्यावेळी अचानक त्यांचे डोके रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या इलेक्ट्रिकच्या खांबावर आदळले. चालक खूप वेगाने गाडी चालवत असल्याने आशा देवींच्या डोक्याला एवढ्या जोरात दणका बसला की त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले व रस्त्यावर पडले. आशा देवींचे पती त्यांच्या शेजारीच बसले होते. जोरात आवाज झाल्यानंतर त्यांनी पत्नीचे शरीर आत खेचले तर त्यांचे शीरच त्यावर नव्हते. हा भयंकर अपघात बघून गाडीतल्या सर्वांना जबरदस्त धक्का बसला. याप्रकरणी गाडीतल्या प्रवाशांनी पोलिसांकडे बस चालकाची तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी बस चालकाला अटक केली.


























































