
आफ्रिकन तस्कर हे हिंदुस्थानात ड्रग तस्करी सोपी जावी म्हणून नॉर्थ ईस्ट राज्यातील महिलांशी लग्न करतात. लग्न केल्यानंतर त्या महिलांना ड्रगच्या धंद्यात सक्रिय करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकतेच एनसीबी मुंबई आणि दिल्ली युनिटने कारवाई करून दोन इथिओपियन नागरिक आणि एका हिंदुस्थानी महिलेला अटक केली. तिच्या चौकशीत हा प्रकार समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रगच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एका नायजेरियन आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीनंतर एनसीबी दिल्ली युनिटने दिल्लीच्या टिळकनगर येथे राहणाऱया महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 4. 984 किलो कोकेन जप्त केले. तिच्या चौकशीनंतर एनसीबीने दोन इथिओपियन नागरिकांना अटक केली. तस्कर हे मुंबई आणि दिल्लीहुन नेटवर्क चालवत होते. मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये एक महिला राहत असून तिच्याकडे 2 किलो कोकेन असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने त्या महिलेला अटक केली. तिच्या चौकशीत ड्रग तस्करीसाठी हिंदुस्थानी महिलांचा कसा वापर होतो हे समोर आले.
आफ्रिकन तस्कर हे नॉर्थ ईस्टमधील महिलांशी विवाह करतात. विवाह केल्यानंतर त्याचा वापर ड्रग तस्करीसाठी करतात. ड्रग हॅन्डलर हे हिंदुस्थानात आल्यावर ते रेकी करतात. रेकी केल्यानंतर विमानतळावर ड्रग पकडू नये म्हणून कोणता मार्ग निवडावा याचे विश्लेषण करतात. एवढंच नव्हे तर प्रसार माध्यमात ड्रगबाबत माध्यमामध्ये कोणत्या बातम्या येतात याची अपडेट माहिती घेऊन ती आफ्रिकन तस्करांना कळवली जाते अशी त्याची मोडस ऑपरेंडी आहे.
एनसीबीने दिल्ली येथून अटक केलेली महिला ही मुख्य सूत्रधाराची पत्नी आहे. मुख्य सूत्रधार हा त्याच्या पत्नीचा वापर ड्रग तस्करीसाठी करत असायचा.




























































