
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरण तालुक्यातील पागोटे गावातील एका महिलेचा साप चावून दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रेवती पाटील (45) असे या महिलेचे नाव असून त्या भाजीपाला विकून कुटूंबाचा उदर निर्वाह चालवत असे. उरण येथिल इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले होते. मात्र वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर याला जबाबदार असून त्याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी उरण पोलिसांकडे केली आहे.
रेवती पाटील या गुरूवारी सकाळी नेहमी प्रमाणे पागोटे गावातील तळ्या जवळ भाजी विकण्या करीता नेहमी प्रमाणे गेली होती. त्यावेळी सकाळी ११-१५ च्या सुमारास त्यांना हातावर साप चावला. त्यानंतर नातेवाईकांनी रेवती पाटीलला उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयात तत्काळ दाखल केले. सदर रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टरांना घडलेल्या घटनेचा माहिती देऊन सदर महिलेवर तातडीने उपचार करण्याची विनंती केली. परंतू रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर नाहीत वैद्यकीय अधिकारी आल्यावर उपचार करण्यात येतील असे नातेवाईक मंडळींना सांगून सर्प दंश झालेल्या रेवती पाटील या महिलेस औषधोपचारासाठी ताटकळत ठेवले.
काही तासाने रेवतीवर उपचार सुरू केले. परंतू काही वेळा नंतर डॉक्टरांनी रेवतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रेवतीवर तत्काळ उपचार झाले असते तर तिचे प्राण वाचले असते. मात्र रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचारात दिरंगाई केल्यामुळेच या महिलेचा मृत्यू झाला असून मुत्यूस जबाबदार ठरणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी उरण पोलीस ठाण्याकडे रेवती पाटील हिचा मूलगा शुभम नरेश पाटील व नातेवाईक मंडळींनी केली आहे. या बाबत डॉक्टरांना, उरण पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.


























































