
कोरोनाची तपासणी होऊ नये म्हणून एका महिलेने पळ काढला आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला पतीसोबत इटलीला हनीमूनला गेली होती. जेव्हा पतीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तेव्हा महिला पळून गेली. कुणालाही न सांगता ती बंगळूरूहून दिल्लीला पोहोचली आणि दिल्लीहून ट्रेनने आग्रायत पोहोचली.
जेव्हा स्थानिक प्रशासनाला ही बाब कळाली तेव्हा ते महिलेच्या घरी पोहोचले. तिच्या कुटुंबीयांना विचारले असता ती इथे आलीच नाही असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी महिलेचा शोध घेतला असता तीए आतल्या खोलीत सापडली. पोलिसांनी तिच्यासह सर्व कुटुंबीयंना इस्पितळात दाखल केले आहे, तसेच सगळयांची कोरोना टेस्ट केली आहे.
तर हिंदुस्थानात कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या वर झाली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनांची रुग्णसंख्या 96 हून 101 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे संकट पाहता केंद्र सरकारने Covid-19 ला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. तर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क देशांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना संकटावर चर्चा करतील.
राज्यात 5 नवीन कोरोनाचे रुग्ण
देशात कोरोना रुग्णांची संख्या आधी 96 इतकी होती. शनिवारी रात्री राज्यात 5 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यात 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. पाचपैकी चारजण दुबईहून परत आले होते. तर एक व्यक्ती थायलंडहून परतला होता. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 31 झाली आहे.
आंतरराष्ट्रीय सीमा बंद
यादरम्यान केंद्र सरकारने परदेशातून येणार्या कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पाच शेजारी राष्ट्रांतील सीमा बंद केल्या आहेत. आदेशानुसार हिंदुस्थान-नेपाळ, हिंदुस्थान-बांग्लादेश, हिंदुस्थान-भूतान, हिंदुस्थान-म्यानमार या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. 14 मार्च रोजी रात्री 12 वाजता ही कारवाई करण्यात आली. आज रात्री 12 वाजता पाकिस्तानची सीमाही बंद करण्यात येणार आहे. या सीमेवरून प्रवाशांचा प्रवेश बंद करण्यात येणार आहेत.



























































