
राज्यातील महिला सर्वच बाबतीत सुरक्षित राहणेकरीता गृहविभागाने ठोस उपाययोजना केल्या असून महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी संपुर्ण गृहविभागाने नियोजन केले आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकार्यांना दिले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहविभाग कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी विधानपरिषदेत दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवठच्या दिवशी विरोधी पक्षामार्फत मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये गृहविभागावरील मागण्यांच्या संदर्भात उत्तर देताना शंभूराज देसाईंनी महिला सुरक्षेची ग्वाही दिली. शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिशा कायदा आणण्याकरीता विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गृहविभाग कायम प्रयत्नशील राहणार आहे. तशा प्रकारच्या सुचना सर्व पोलीस अधिकार्यांना दिल्या आहेत. ठोस उपाययोजनेतून आणि योग्य नियोजनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या चार वर्षात राज्यामध्ये घुसखोरी केलेल्या 3,431 बांगलादेशी व्यक्तींवर 660 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 606 आरोपींना राज्यातून परत पाठविण्यात आले आहे. मुंबईतील आळणारा परिसरात 3 बांगलादेशीवर कारवाई करण्यात आली असून साकीनाका परिसरातील 22 बांगलादेशीमध्ये 10 महिला व 12 पुरुष असून त्यांच्च्याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे रहिवाशीचे दाखले मिळून आले आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
























































