Womens Ahses 2022 उत्कंठावर्धक! थरारक!! अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना ‘अनिर्णित’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये अॅशेस मालिकेचा एकमेव सामना खेळला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेला हा सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या 13 चेंडूंमध्ये 13 धावा हव्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाला विजयापासून फक्त एक विकेट दूर होता. मात्र इंग्लंडच्या अखेरच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवले. पहिल्या डावात नाबाद दीडशतक आणि दुसऱ्या डावात 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या हेदर नाईट (Heather Knight) हिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ हा पुरस्कार देण्यात आला.

एकमेव कसोटीचा अखेरचा दिवस नाट्यमय घडामोडींनी भरलेला राहिला. ऑस्ट्रेलियाने 7 बाद 217 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ 48 षटकांमध्ये 9 बाद 245 धावांपर्यंत पोहोचू शकला. इंग्लंडच्या अखेरच्या जोडीने शेवटचे दोन षटकं खेळून काढत ऑस्ट्रेलियाला विजयापासून वंचित ठेवले.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात दमदार झाली. लॉरेन विनफिल्ड हिल (Lauren Winfield Hill) आणि टॅमी ब्यूमंट (Tammy Beaumont) हिने इंग्लंडला अर्धशतकीय सलामी दिली. वैयक्तिक 36 धावांवर टॅमी बाद झाली तेव्हा इंग्लंडच्या 52 धावा झाल्या होत्या. त्यानंतर मैदानात आलेली कर्णधार हेदर नाईट हिने धुव्वादार फलंदाजी केली. तत्पूर्वी हिल 33 धावांवर बाद झाली.

कर्णधार नाईट हिने नताली स्कीव्हर (Natalie Sciver) हिच्यासोबत अर्धशतकीय भागिदारी केली. वेगाने धावा काढणाऱ्या नाईटमुळे ऑस्ट्रेलियाची टीम चिंतेत दिसून लागली होती. मात्र डर्सी ब्राऊन (Darcie Brown) हिने तिला बाद करताच संघाने सुटकेचा निश्वास सोडला. नाईटने 54 चेंडूत 48 धावा काढल्या. तर सोफिआ डंक्ली (Sophia Dunkley) हिने 45 धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाचे पुनरागमन

नताली बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले. अवघ्या 26 धावांमध्ये इंग्लंडचे 6 खेळाडू बाद करत ऑस्ट्रेलियाने सामना आपल्या बाजूने झुकवला. मात्र शेवटच्या जोडीने अखेरचे 13 चेंडू खेळून काढल्याने इंग्लंड हा सामना अनिर्णित राखू शकला. यावर ऑस्ट्रेलियाचा पुरुष खेळाडू मार्नस लाबुशेन याने ट्विट करत सामना जबरदस्त झाल्याचे म्हटले.

धावफलक –

ऑस्ट्रेलिया – पहिला डाव 9 बाद 337 आणि 7 बाद 216 वर घोषित
इंग्लंड – 297 आमि 9 बाद 245 धावा