
पहिल्या महिला प्रीमियर लीगच्या यशानंतर लीगचे दुसरे पर्व आणखी दिमाखात केले जाणार असून उद्या, शनिवारी 30 खेळाडूंसाठी बोलीचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. 30 जागा असल्या तरी जगभरातील 165 महिला खेळाडूंमध्ये लिलावाचे द्वंद्व रंगले जाणार आहे. त्यामुळे या लिलावात कोणाचे भाग्य फळफळते आणि कुणावर कोटींचा वर्षाव होते ते उद्याच कळेल.
लिलावासाठी निश्चित केलेल्या 165 खेळाडूंपैकी 104 हिंदुस्थानी तर 61 विदेशी खेळाडू आहे. तेसुद्धा 15 क्रिकेट खेळणाऱया देशांमधल्या. विशेष म्हणजे केवळ 56 खेळाडूंनाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करता आले आहे आणि 109 खेळाडू अद्याप त्या मंचापर्यंत पोहोचलेले नाहीत. पहिली महिला प्रीमियर लीग मुंबईतच खेळली गेली होती. मात्र दुसरी प्रीमियर लीग मुंबई आणि बंगळुरूमध्ये खेळविली जाणार आहे. गतवर्षीचेच पाच संघ म्हणजे गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरिअर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स हे चांगले खेळाडू आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.






























































