पुणे-कोल्हापूर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पुणे-कोल्हापूर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे. शेणोली ते ताकारी यादरम्यान हे काम करताना कोणताही अडसर नसल्याने रेल्वे बोर्डाने या मार्गावर कामास गती दिली आहे. विद्युतीकरण काम चाचणीयोग्य ठरल्यानंतर विजेवरील रेल्वेचे टेस्टिंग करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर काम पूर्ण ठरण्यासाठी शेणोली ते ताकारी हा मार्ग रेल्वे विभागासाठी दिशादर्शक ठरला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विजेवरील रेल्वे व दुहेरी मार्ग हे विषय चर्चेत होते. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून याबाबत मागणी होत होती. 2017 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्राधान्याने लक्ष देत याकामी निधीची तरतूद केली होती. यानंतर रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कामास प्रारंभ केला. कालमर्यादा ठरवून कामही सुरू केले. यास अनुसरून रेल्वेतील विद्युत व बांधकाम विभाग जोमात होता. यामधील विद्युतीकरणाचे काम गतीने सुरू झाले.

भूसंपादन व इतर तांत्रिक बाबी लक्षात घेता रेल्वे बोर्डास शेणोली ते ताकारी मार्गावर कोणताच अडसर नसल्याने हे काम प्राधान्याने सुरू झाले. रेल्वेचा दुहेरी मार्ग करताना आवश्‍यक खोदाई, भराव व छोट्या पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मोठ्या क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर तसेच विद्युत खांबांची उभारणी करण्यात आलेली आहे. शेणोली, भवानीनगर व ताकारी स्थानकाची नव्याने बांधणी व सुविधा पूर्ण केल्या आहेत. या मार्गामुळे शेणोली रेल्वे स्थानकास नवी झळाळी आली आहे. संबंधित कामाचा दैनंदिन अहवाल “फिल्ड’वरील अभियंत्यांकडून थेट रेल्वे बोर्डाच्या दिल्ली येथील कार्यालयात पाठवला जात आहे. तेथून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले आहे.