महिला रिकर्वमध्ये हिंदुस्थान पात्रता फेरीत अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या रिकर्व तिरंदाजांनी जवळपास दोन वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन करताना जबरदस्त सुरुवात केली. अंकिता भगत व दीपिका कुमारी यांच्या अचूक कामगिरीमुळे हिंदुस्थानचा महिला संघ पात्रता फेरीत अव्वल स्थानावर राहिला. अतानु दासने अव्वल मानांकित ब्रेडी एलिसननंतर दुसरे स्थान मिळवल्यामुळे हिंदुस्थानच्या पुरुष संघाला तिसरे स्थान मिळवण्यात यश आले. हिंदुस्थानच्या पुरुष व महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अतनु दास व दीपिका या मिश्र दुहेरीतील जोडीकडून हिंदुस्थानला आशा आहे. दास-दीपिका जोडीचा सामना फ्रान्सच्या जोडीशी होईल. पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवलेला हिंदुस्थानी संघ यजमान ग्वाटेमालाच्या संघाशी भिडेल. हिंदुस्थानचा पुरुष संघ अंतिम आठमध्ये स्पेन व गुआटेमाला यांच्यातील विजेत्या संघाशी दोन हात करेल. बर्लिनमध्ये जुलै 2019 मध्ये झालेल्या चौथ्या चरणानंतर हिंदुस्थानी संघ प्रथमच विश्व कप स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा म्हणजे एक प्रकारे रंगीत तालीमच असणार आहे. हिंदुस्थानी तिरंदाजांना या स्पर्धेत आपल्या तयारीबद्दल अंदाजही घेता येणार आहे.

दीपका पुमारीने 339 गुणांची कमाई करीत पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवले. अन्ना वाजक्वेज व अंकिता यांच्यावर तिने चार गुणांची आघाडी मिळवली होती, मात्र त्यानंतर अंकिता तिच्या पुढे गेली. अंकिताने 673, तर दीपिकाने 671 गुण मिळवले. कोमालिका बारी 659 गुणांसह 12व्या स्थानी राहिली. मात्र या त्रिमूर्तीने मेक्सिको संघापेक्षा 14 गुण अधिक मिळवत अव्वल स्थान पटकावले.

पुरुष गटात हिंदुस्थानचा आघाडीचा तिरंदाज अतानु दासने अमेरिकेच्या एलिसनपेक्षा 14 गुणांनी पिछाडीवर राहत पात्रता फेरीत 694 गुणांसह दुसरे स्थान मिळवत कारकीर्दीतील सर्वेत्तम कामगिरी केली. प्रवीण जाधव 15 व्या, तर बी. धीरज 20 व्या स्थानी राहिल्याने हिंदुस्थानी संघाला तिसरे स्थान मिळवण्यात यश आले. या स्पर्धेत हिंदुस्थानचे केवळ रिकर्व तिरंदाजच सहभागी झाले आहेत. कारण प्रशिक्षणांना कोरोनाची लागण झाल्याने अभिषेक वर्मा व ज्योती सुरेखा या हिंदुस्थानच्या कंपाऊंड संघाला स्पर्धेतून बाद करण्यात आले.