
वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या 19 वर्षांखालील आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा कर्णधार कासिम अकरम याने 19 वर्षांखालील विश्वचषकामध्ये आजवर कोणालाही जमला नाही असा भीमपराक्रम करून दाखवला आहे. विश्वचषकाच्या पाचव्या स्थानासाठी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात कासिमने फलंदाजी करताना 80 चेंडूंत नाबाद 135 धावा केल्या. एवढय़ावरच न थांबता त्याने गोलंदाजी करताना श्रीलंकेचे पाच फलंदाज बाद केले. एकाच सामन्यात शतक आणि पाच गडी बाद करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. हिंदुस्थान अंतिम लढतीत इंग्लंडशी झुंज देणार आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ात विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. या स्पर्धेच्या पाचव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेवर मात केली.
कासिमच्या नाबाद 135 धावा आणि 37 धावांत 5 विकेट
कर्णधार कासिमने फलंदाजी करताना 80 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 13 चौकारांच्या जोरावर नाबाद 135 धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना 10 षटकांमध्ये 37 धावा देत लंकेचे 5 फलंदाज तंबूत धाडले. 19 वर्षांखालील विश्वचषकामध्ये आजवर कोणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही.




























































