कोरोनापेक्षा मानसिक आजारांचा सर्वात मोठा धोका; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनापेक्षाही मोठा धोका हा मानसिक आजारांचा असून त्यावर वेळीच उपचार न केल्यामुळे आयुष्यमानात घट होत आहे. त्याचबरोबर जगाच्या आर्थिक पिछेहाटीलाही हेच मानसिक आजार कारणीभूत आहेत. 2030 पर्यंत कर्करोग, मधुमेह, श्वसनविषयक आजारांपेक्षा मानसिक आजारांमुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण हे मोठे असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आजारांवरील आपल्या अहवालात म्हटले आहे.

जगाला गेली अडीच वर्षे वेठीस धरणाऱ्या कोरोनामुळे अनेक जागतिक महाशक्तींना धक्का बसला असून त्यामुळे उद्योगधंद्यांवर आर्थिक तर लोकांवर मानसिक परिणाम झाला आहे. आधीच मानसिक आजारांनी त्रस्त असलेल्या देशांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे मोठी भर पडली आहे. लॉकडाऊन आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक घसरणीमुळे, आर्थिक संकटामुळे जगात गेल्या एक वर्षांत उदासीनतेत 28 टक्के तर सतत चिंतेत असणाऱ्या लोकांमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्या देशांमध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त हाहाकार निर्माण झाला त्या देशांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले.

प्रगत देशांना सर्वाधिक धोका

प्रगत देशांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण मोठे आहे. त्या तुलनेत विकसनशील आणि प्रगतशील देशांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण हे कमी आहे. मात्र, विकसनशील आणि प्रगतशील देशांमध्ये मानसिक आजार ओळखणे आणि त्यावर वेळीच उपचार करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये आजही मानसिक आजारांकडे वेडेपणा म्हणून पाहिले जाते. समाजाच्या दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण हे जास्त आहे. महिलांमध्ये उदासीनता आणि नैराश्येचे प्रमाण हे 50 टक्के इतके आहे.

आजारांमुळे आर्थिक फटका

जगभरात वर्षाला 1 ट्रिलीयन डॉलर्स उदासीनता आणि नैराश्याच्या आजारपणावर खर्च केले जात असतात. मानसिक आरोग्यावरील बजेटमध्ये जगात केवळ 2 टक्के पैसे खर्च केले जातात. 2010 साली जगाने मानसिक आजारपणावर 2.5 ट्रिलीयन डॉलर्स खर्च झाले. मानसिक आजारांवर खर्च वाढत जाणार असून 2030 साली हा खर्च 6 ट्रिलीयन डॉलर्सवर पोहोचणार आहे. गरीब देशांमध्ये एक लाख लोकांमागे केवळ 1 मानसिक आरोग्य कर्मचारी उपलब्ध आहे. जगात मानसिक आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.

आयुष्य 10 ते 20 वर्षांनी घटणार

ज्या लोकांना मानसिक आजार आहेत अशा लोकांना ह्रदयविकार आणि श्वनसविषयक आजारांचा धोका वाढतो. ज्या लोकांना स्क्रिझोफ्रेनिआ आणि बायपोलर आजार आहेत अशा लोकांचे आयुष्य सुमारे 10 ते 20 वर्षांनी कमी होते. मानसिक आजारांच्या परिणामांमुळे त्याचे पर्यवसान अपंगत्वात होते. हे टाळण्यासाठी मानसिक आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण 2 टक्क्यांनी वाढवले तर मानसिक आरोग्यामुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण हे कमी केले जाऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.

मानसिक आजारांचे जागतिक प्रमाण (टक्क्यांमध्ये)

अतिचिंता (301), उदासीनता (280), मेंदूशी संबंधित आजार (108), एडीएचडी (85), बायपोलर (40), कंडक्ट डिसऑर्डर (40), स्वमग्नता (28), स्क्रिझोफ्रेनिया (24), अतिखाण्याचा आजार (14).

टीबी रोखणार बीसीजीचा बुस्टर डोस

टीबीसाठी देण्यात येणाऱ्या बीसीजी लसीचा बुस्टर डोस टीबी रुग्णाच्या घरातल्या लोकांना दिल्यास टीबीचा प्रसार रोखता येईल का, याबाबत आयसीएमआर राष्ट्रीय टीबी नियंत्रण संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात 6 ते 18 वयोगटातील सुमारे 9 हजार मुलांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे टीबीच्या नव्या रुग्णांना अटकाव करता येईल आणि टीबी उपचारावर होणारा खर्चही कमी करता येईल, असे राष्ट्रीय टीबी नियंत्रण संस्थेच्या संचालिका डॉ. पद्मप्रियदर्शनी सी यांनी म्हटले आहे.