वरळी हिट ऍण्ड रन प्रकरण मिहीर शहाच्या याचिकेवर पोलिसांची भूमिका काय? प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीत बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहाच्या याचिकेवर पोलिसांची भूमिका काय आहे? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. मिहीर शहा व त्याचा चालक राजऋषी बिडावत या दोघांच्या याचिकेवर न्यायालयाने पोलिसांचे उत्तर मागवले आहे.

मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीर शहाने 7 जुलैला बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवली आणि वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. मिहीरने कावेरी यांना निर्दयीपणे वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले होते. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरला 9 जुलैला विरारच्या रिसॉर्टमधून अटक केली होती. ही अटकेची कारवाई बेकायदा असल्याचा दावा करीत मिहीरने तुरुंगातून सुटकेसाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्याच्यासह राजऋषी बिडावत या दोघांच्या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिसांना 29 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत सुनावणी तहकूब केली.