कथा एका चवीची – ‘पुरण’कथा

>>रश्मी वारंग

आषाढ श्रावणासोबत येणारे सण आपल्या संपन्न खाद्य परंपरेला उजाळा देतात. आजच्या दीपपूजनाच्या निमित्ताने आणि याच आठवडय़ात येणाऱ्या नागपंचमीच्या निमित्ताने तयार होणारे पुरणाचे दिंडं म्हणजे मराठमोळ्या संस्कृतीचा आरसा. याच पुरणाची ही सफळ संपूर्ण कहाणी.

प्रत्येक ऋतू आपलं सौंदर्य मिरवत येतो आणि या ऋतुसोहळ्यासोबतच भारतीय पक्वान्नांची थाळी बदलत जाते. आजच्या दीपपूजनासह आषाढ निरोप घेईल आणि ऋतु हिरवा श्रावण आपल्या दारी येईल. आषाढ श्रावणासोबत येणारे सण आपल्या संपन्न खाद्य परंपरेला उजाळा देतात. आजच्या दीपपूजनाच्या निमित्ताने आणि याच आठवडय़ात येणाऱ्या नागपंचमीच्या निमित्ताने तयार होणारे पुरणाचे दिंडं म्हणजे मराठमोळ्या संस्कृतीचा आरसा. याच पुरणाची ही सफळ संपूर्ण कहाणी.

महाराष्ट्राची खासियत असणारी पुरणपोळी भारतभर प्रसिद्ध आहे. पण प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवणं शक्य नसतं. अशा वेळी नुसत्या पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणा-वरणाचा नैवेद्य ही संकल्पना आजही अनेक घरांत वापरली जाते. पुरणाचं नातं नैवेद्याशी कसं जुळलं?

हरभरा हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं कडधान्य आहे. विशेष करून शाकाहारी मंडळींसाठी प्रथिनांची गरज हे धान्य मोठय़ा प्रमाणात पूर्ण करतं. हरभरा हे जगातील तिसरं महत्त्वाचं कडधान्य असून आशिया खंडात भारत हा प्रमुख हरभरा उत्पादक देश आहे. जगातील 68 टक्के हरभरा भारतात उत्पादित होतो. या धान्याचं हे महत्त्व लक्षात घेतलं तर कृषी संस्कृतीत पुरणाचा नैवेद्य ही संकल्पना का महत्त्वाची ठरली हे लक्षात येतं.

पुरण बनवण्याची पद्धत भारतभरात वेगवेगळी आहे. गुजरातेत तुरीची डाळ वापरून पुरण बनतं. तर दक्षिणेत गुळाचंच पुरण असतं पण त्यात ओला नारळ वापरतात. पारशी लोक जी पुरणपोळी करतात, ज्याला ते ‘दाल नी पोरी’ म्हणतात त्यात सुकामेवा तसंच इसेन्स वापरतात. 12 व्या शतकातला दक्षिण भारतीय राजा सोमेश्वर याने लिहिलेल्या संस्कृत लेखनाच्या संदर्भात पुरणाचा उल्लेख आढळतो. गोविंदासांनी लिहिलेल्या भैषज्यरत्नावली आणि भावप्रकाश या दोन ग्रंथात पुरण कसं बनवावं याचा उल्लेख आढळतो. मात्र त्यात तूर डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ या तीन प्रकारच्या डाळींचे पुरण करावं असा सल्ला दिलेला आहे. पेशव्यांच्या खाद्य इतिहासात पिवळ्या रंगाचा गूळ, चण्याची डाळ आणि वेलची घालून केलेल्या पुरणाबद्दल लिहिलेलं आढळतं.

अशा या पुरणाचे दिंडं दीपपूजनाच्या दिवशी तसंच नागपंचमीला बनवण्याची प्रथा आहे. दिंडं म्हणजे नेमकं काय याचा शब्दकोशात शोध घेतला असता, गाठोडं असा अर्थ गवसतो. पुरणाचे दिंडं पाहिल्यावर हे नाव का मिळालं असेल याची पूर्ण कल्पना येते. पुरणाचे दिंडं बनवण्यासाठी नेहमीप्रमाणे पुरण बनवलं जातं. नंतर कणिक तिंबून मध्यम जाडसर पुऱया लाटल्या जातात. त्या कणकेच्या पुरीत पुरण भरून चारही बाजूंनी बंद करून त्याचे गाठोडय़ासारखे दिंडं बनवले जातात. ते वाफवून खाल्ले जातात. नागपंचमीच्या सणाला सुरी, विळी वापरली जात नाही. त्यामुळे या गोष्टींचा वापर टाळून दिंडं बनत असल्याने ही प्रथा अधिक समर्पक वाटते.

आपल्या अनेक प्रथा, व्रत-वैकल्ये, परंपरा, खाद्य संस्कृतीमुळे अधिक जवळच्या वाटतात. सणांचा राजा म्हणविल्या जाणाऱया श्रावणातील ‘क्षणात येणारे सरसर शिरवे’ आणि ऊन-पावसाचा खेळ या परंपरांना अधिकच प्रसन्न करतो. दीपपूजनाचं तेज, नागपंचमीची निसर्गपूजा आणि श्रावणमासाची सुरुवात यांच्या जोडीने या पुरणावरणाच्या नैवेद्यासह आयुष्यही मिट्ट गोड होवो ह्याच शुभेच्छा.

(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)