
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला. यामुळे पहिल्या-वहिल्या कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंग पावले. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली संतप्त झाला असून त्याने संघात बदलाचे संकेत दिले आहेत.
पराभवानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘आम्ही आत्ममंथन करत राहू आणि मजबूत संघ मैदानात उतरवण्यासाठी काम करत राहू. तसेच कामगिरीची समिक्षा केल्यानंतर योग्य खेळाडूंना संघात स्थान दिले जाईल. चांगली कामगिरी करण्याची मानसिकता असणाऱ्या खेळाडूंना घेऊनच मैदानात उतरू, असेही तो म्हणाला. यादरम्यान विराट कोहली याने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही, मात्र त्याचा रोख थेट चेतेश्वर पुजाराकडे असल्याचे दिसून आले.
संघातील ज्येष्ठ खेळाडू असणाऱ्या चेतेश्वर पुजारा याने कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीतील पहिल्या डावात 54 चेंडू खेळून फक्त 8 धावा केल्या. पहिली धाव काढण्यासाठी त्याने तब्बल 35 चेंडूंचा सामना केला. यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 80 चेंडूत 15 धावा केल्या. तसेच गेल्या दोन वर्षात पुजाराच्या बॅटमधून मोठी धावसंख्याही निघालेली नाही. त्यामुळे संघातून काढण्याची टांगती तलवार त्याच्यावर आहे.
वाट पाहणार नाही
दरम्यान, संघातील ज्येष्ठ खेळाडूंना एक संधी दिली जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र यावर बोलताना विराट म्हणाला की, आम्ही एक वर्ष वाट पाहणार नाही. टीम इंडियाचा मर्यादित षटकांचा संघ पाहिल्यास आमच्याकडे खोलवर फलंदाजी असून सर्व खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत. कसोटी क्रिकेटलाही याची गरज आहे, असेही तो म्हणाले. तसेच संघासाठी काय महत्वाचे आहे हे ओळखून निडर होऊ खेळणे आवश्यक असल्याचे तो म्हणाला.
योग्य खेळाडूंना संधी दिली जाईल
चांगले प्रदर्शन करण्याच्या मानसिकतेने मैदानात उतरणाऱ्या योग्य खेळाडूंना संघात स्थान दिले जाईल, असे विराट म्हणाला. तसेच खेळताना तुमची कामगिरी सतत उंचावणारी असायला हवी. खास करून जेव्हा तुम्ही सातत्याने अनेक वर्ष जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असता तेव्हा अचानक तुमची कामगिरी खराब होऊ शकत नाही. याबाबत आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असेही तो म्हणाला.
कसोटी क्रिकेटचा किंग ‘न्यूझीलंड’, हिंदुस्थानला हरवून जेतेपदावर मोहोर
धावा करण्याकडे लक्ष असावे, विकेट वाचवण्याकडे नाही
धावा कशा बनवायच्या आणि सामना हातातून निसटू नये यावर आम्हाला काम करायची आवश्यकता आहे, असेही विराट म्हणाला. गोलंदाजांचा निडरपणे सामना करायची गरज आहे. तसेच पहिल्या दिवसासारखा स्विंग नसेल तर गोलंदाजांना सतत एकाच टप्प्यावर गोलंदाजी करण्याची संधी फलंदाजांना देऊ नये, असेही तो म्हणाला. फलंदाजांचे लक्ष धावा करण्याकडे असावे, आपली विकेट वाचवण्याकडे नाही, असेही विराट म्हणाला.




























































