यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
exam-pattern
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । लातूर

लातूरमध्ये परिक्षा आणि कॉपी हे समीकरण रुढ झालेले आहे. मुक्त विद्यापीठाच्या परिक्षांनाही कॉपीचे ग्रहण लागले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा शनिवारचा पेपर सुरू झाल्यानंतर तब्बल तासाभरानंतर असतानाच अचानक पेपर फुटला असल्याचे समजले. त्यामुळे तासाभरानंतर विद्यार्थ्यांनी सोडवलेला पेपर काढून घेत त्यांना नवे पेपर देण्यात आले. त्यामुळे ऐन पेपर सुरू असतानाच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रकरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवीच्या परिक्षा सध्या सर्वत्र सुरू आहेत. आज बीए तृतीय वर्षाचा अर्थशास्त्राचा पेपर सकाळी 10.30 वाजता सुरू झाला. विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यास सुरुवात केली. एक तासाचा अवधी होत आला आणि हा पेपर फुटल्याच्या कारणावरुन दिलेला पेपर रद्द करण्यात आल्याची सुचना परिक्षार्थ्यांना देण्यात आली. ईमेलवरुन दुसरा पेपर पाठवण्यात आला, त्याचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना नवीन प्रश्नपत्रिका देण्यात आली. एक तासाचा अवधी वाढवून देण्यात आला. या झालेल्या त्रासाबद्दल परिक्षार्थ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण झालेली होती. पेपर फोडणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई केली गेली तरच असे गैरप्रकार पुन्हा घडणार नाहीत असे म्हटले जात होते. या गोंधळात परिक्षार्थींना हकनाक एक तास अधिक तर बसावे लागलेच परंतू अगोदर लिहीलेला पेपरही रद्द झाला त्यामुळे केलेली मेहनतही वाया गेली.