आठवण – स्वरसागरातील पु.ल.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात आपल्या सर्वांचे पु. ल. हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या प्रत्येक मराठी माणसाचे एक लाडके व्यक्तिमत्व मानले जाते. लेखक, पटकथा लेखक, कवी, गीतकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, वक्ता, पार्श्वगायक हार्मोनियम वादक आणि संगीतकार असे खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.  12 जून हा त्यांचा स्मृतिदिन. पुलंनी त्यांच्या चाहत्यांवर केलेल्या या आनंददायी उपकारांची परतफेड कधीच होऊ शकणार नाही. म्हणूनच, केवळ ‘संगीतकार पु. ल.’ या त्यांच्या एकाच पैलूवर भाष्य करण्यासाठी आणि त्यांच्या या अफाट कर्तृत्वाला विनम्र अभिवादन करण्यासाठी माझ्या ‘स्वरसुमन’ या ग्रुपतर्फे आम्ही ‘स्वरसागरातील पु.ल.’ हा कार्यक्रम करण्याचे ठरविले.

‘स्वरसागरातील पु.ल.’ हा कार्यक्रम अधिक मनोरंजक कसा करता येईल यादृष्टीने विचार करताना कार्यक्रम दृक-श्राव्य स्वरूपात करावा असे ठरविले. संकल्पना सुचल्यावर माहितीचे संशोधन करून त्यासाठीची संहिता मी लिहून काढली. ते ‘पॉवर पॉइंट (पीपीटी)’ स्वरूपात सादर करण्याचे ठरविले. प्रत्येक गाण्याच्या आधीच्या निवेदनावेळी मागे पडद्यावर त्या निवेदनाला चपखल आणि समर्पक असे छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत असावी अशी कल्पना मनात आली. त्यासाठी गुगलवर खूप शोध घेतल्यावर अनेक तत्कालीन कलाकारांची, कवींची, चित्रपटांच्या पोस्टर्सची छायाचित्रे मिळाली. ती सर्व ‘पीपीटी’मध्ये समाविष्ट केली. निवेदन अत्यंत बांधेसूदपणे तयार केले. म्हणजे निवेदन आणि गाणे सुरू असताना पडद्यावर योग्य तेच छायाचित्र दिसेल याची पूर्ण दक्षता घेतली. त्यामुळे निवेदकाने संहितेव्यतिरिक्त कोणतेही अधिक वाक्य उच्चारायचे नाही ! कारण त्यामुळे प्रत्यक्ष सादर होत असलेले गीत आणि मागे पडद्यावर दिसत असलेले चित्र यामध्ये कोणतीही तफावत दिसू नये. कार्यक्रमात काही निवडक गाण्यांचाच समावेश करण्यात आला आहे.

‘नाच रे मोरा…’, ‘पाखरा जा…’ या गीतांच्या सादरीकरणावेळी पडद्यावर अत्यंत समर्पक ध्वनिचित्रफीत सादर होते. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. कार्यक्रमात पुलंच्या हार्मोनियम वादनाची झलक, श्रीमती ज्योत्स्ना भोळे आणि श्रीमती माणिक वर्मा यांच्या पुलंच्या गाणे शिकविण्याच्या संदर्भातील किस्से इत्यादींची एक ओझरती झलकही पाहायला मिळते. त्यामुळे रसिक प्रेक्षक स्मरणरंगात रंगून जातात.

कार्यक्रमात प्रत्यक्ष गाणी सादर करण्यात ललित देशपांडे, मानिनी गुर्जर, आसावरी करमरकर, प्राची गोडबोले यांचा सहभाग असतो, तर हार्मोनियमच्या साथीसाठी संपदा देशपांडे, व्हायोलिनच्या साथीसाठी उमा जटार, तबल्याच्या साथीसाठी मंदार बगाडे व स्वानंद जवळेकर, तर तालवाद्यांसाठी माझा सहभाग असतो. सौ. वीणा केळकर यांनी संहिता लेखनास आणि कार्यक्रमात त्याचे निवेदन करण्याचे मोलाचे सहकार्य केले आहे. ‘पीपीटी’चे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात माझा मुलगा प्रथमेश, सून सायली, दीपा पुसाळकर, ईशा पुसाळकर आणि स्वाती मेहेंदळे यांचाही वेळोवेळी सहभाग लाभतो. सर्वच कलाकार पुलंची ही साधी-सोपी वाटणारी, पण गायला अवघड असणारी गाणी अत्यंत मेहनतीने बसवून सादर करीत असतात.

यशोधन जटार