ग्रामीण भागातही आता यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या रोडावत चालली असून, पारंपरिक बैलपोळा बैलाच्या कमतरतेने लोप पावत चालल्याचे चित्र आहे. तर काही बैल पोळ्यात बैलजोडीची संख्या तोकडी दिसून येते. यांत्रिकीकरणात शेती मशागतीची कामे आता ट्रॅक्टर या यंत्राने व्हायला लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आले असून सिंदेवाही तालुक्यातील नवरगावात मागील 4 वर्षापासून चक्क पांरपरिक बैल पोळ्याला बगल देत ट्रॅक्टर मालकांनी नवरगावात ट्रॅक्टर पोळा भरविण्यात येत आहे.
हा पोळा आणि गावातून निघालेली ट्रॅक्टरची मिरवणूक आकर्षणाचे केंद्रबिंदू आणि चर्चेचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे साधन म्हणून अनादिकाळापासून बैलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाची पोळा या सणाला शेतकरी मनोभावे पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घालतो. ही परंपरा कित्येक वर्षापासून चालत आली आहे आणि आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जोपासली जात आहे. परंतु, या परंपरेला यांत्रिकीकरणामुळे काही ठिकाणी छेद दिला जात असल्याचे चित्र आता दृष्टीस पडू लागले आहे. या विज्ञान युगात बैलाची जागा ट्रॅक्टर ने घेतली असल्याने बैल पोळयासोबत ट्रॅक्टर पोळ्याचा आनंद साजरा करण्याची पद्धत रूजत असल्याचे चित्र दिसून येत आहे .