
>> योगेंद्र ठाकूर
महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याला आता 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. धार्मिक अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी, परंपरांमुळे सर्वसामान्यांचे शोषण रोखणे, भिक्षुकशाहीच्या विरोधात जनतेत जागृती निर्माण करणे, सावकारी व सरकारी पाशातून शेतकऱयांना मुक्त करणे आणि अस्पृश्यांना बहिष्कृत ठरविणाऱया पारंपरिक लोकसमजुती दूर करणे यासाठी लोकशिक्षण चळवळ उभारणे हे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते, परंतु महात्मा फुले यांच्या निधनानंतर चळवळ काहीशी शिथिल झाली. तिला पुनर्जिवित करण्याचे काम 1910 मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले.
महाराष्ट्रात काही ठिकाणी सत्यशोधक समाजाने कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नियमितपणे परिषदा घेऊन सत्यशोधक समाजाच्या चळवळीला चालना दिली गेली. सत्यशोधक समाज परिषदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रात्री सत्यशोधकीय जलशाचा कार्यक्रमही होत असे. गावकरी-शेतकरी यांच्या प्रबोधनाचे कार्य जलशाद्वारे काही मंडळी करत होते. जलशांच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रचार होत होता. तरी जलशांच्या जोडीला नियतकालिकांच्या माध्यमातून सत्यशोधक चळवळीचा प्रसार करण्याचे प्रयत्न पुणे, कोल्हापूर, जळगाव, अमरावती आदी ठिकाणांहून झाले.
त्यात भास्करराव जाधवांचा ‘मराठा दीनबंधू’, ‘प्रबोधनकार’ केशव सीताराम ठाकरे यांचे ‘प्रबोधन’, दिनकरराव जवळकरांचा ‘कैवारी’, मुकुंदराव पाटील यांचा ‘दीनमित्र’, नारायण रामचंद्र विभुते यांचा ‘सत्यप्रकाश’ आदी नियतकालिके आघाडीवर होती. या नियतकालिकांचे ध्येय मुखपृष्ठावर छापले होते. ‘मराठा दीनबंधू’च्या मुखपृष्ठावर ‘विद्येत मागासलेल्या लोकांकरिता’ तर ‘कर्मवीर’ पत्राच्या मुखपृष्ठावर ‘श्रीमंत क्षात्र जगद्गुरू करवीर यांचे आश्रयाखालील पाक्षिक पत्र’ असे स्पष्ट शब्दांत छापले होते. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या मुखपृष्ठावर ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नित बोधत’ असे वचन छापले होते. मुकुंदराव पाटलांच्या ‘दीनमित्र’चा शिरोमणी ‘ज्याशी दुःखाने गांजिले, तोचि सोयरे आपुले’ हा श्लोक छापून दीनदुबळ्यांची सेवा करण्याची बांधीलकी असल्याचे अधोरेखित केले होते. नारायण रामचंद्र विभुते यांच्या ‘सत्यप्रकाश’च्या अग्रलेखाचा शिरोमणी ‘भोंदू धूर्त फसविती, असत्य धर्मे अशिक्षित लोका, सत्यप्रकाशाची इच्छा व्हावी त्यांची तयातुनी सुटका’ असा श्लोक छापत असे.
या सर्व नियतकालिकातून सत्यशोधक चळवळीचा प्रसार होत होता. त्यातील लेखांनी ब्राह्मणेतर समाजात जागृती होत होती. ‘नाठाळाचे माथी काठीचे घाव’ घातले जात असले तरी आतून ‘मऊ मेणाहुनी मऊ’ अशी मृदू वाणीही या नियतकालिकाच्या लेखनातून पाझरत होती. समाजबांधणीसाठी अशा लेखांचा परिणाम होत होता. ‘दीनबंधू’तील लेखमालेमुळे मराठा शिक्षण परिषदेच्या स्थापनेला गती मिळाली. सायमन कमिशनच्या वेळी ब्राह्मणेतर पक्षाची बाजू ‘कैवारी’मधून सुस्पष्टपणे मांडण्यात आली. मुंबईतील कामगार चळवळीच्या लढय़ाला ‘कैवारी’ व ‘नवयुग’मधील लिखाणामुळे बळ प्राप्त झाले. ‘सत्यवादी’ नियतकालिकाने स्त्राrशक्ती विशेषांक, विधवा विवाह पुरस्कार विशेषांक, महाराणी ताराराणी विशेषांक, राजर्षी शाहू विशेषांक असे विशेषांक काढून आशयाची व्याप्ती वाढविली. या नियतकालिकांतील लिखाणामुळे सत्यशोधक चळवळीची व्याप्ती वाढली.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला तोंड फुटले होते. शाहू महाराज त्या खटल्यात व्यग्र होते. इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी सातारच्या छत्रपतींना पदभ्रष्ट करण्याचे कारस्थान, नारायणराव पेशव्यांचा खून यामागे कायस्थांचे कुटील कारस्थान असल्याचा आरोप केला. प्रबोधनकार ठाकरे यांनी यासंबंधी अस्सल कागदपत्रे मिळवून 1918 मध्ये ‘कोदंडाचा टणत्कार’ या पुस्तकातून राजवाडे यांनी केलेल्या आरोपाची चिरफाड करून ‘सत्य इतिहास’ महाराष्ट्रासमोर मांडला होता. मग इंग्रज सरकारने कारवाई करून वि. का. राजवाडेंच्या इतिहास संशोधन मंडळाचे दोन हजार रुपयांचे अनुदान रद्द केले. त्यानंतर शाहू महाराजांनी प्रबोधनकारांचे अभिनंदन केले होते. शाहू महाराजांना महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीविषयी आस्था होती. त्यामुळे सत्यशोधक चळवळीचा प्रसार करणाऱया नियतकालिकांना त्यांचा सदैव पाठिंबा होता. सत्यशोधक चळवळीचा प्रचार व प्रसार करणाऱया या सर्व नियतकालिकांतील लिखाणाच्या योगदानाने एक इतिहास निर्माण केला.






























































