शारीरिक संबंध ठेवणं बंद केल्याने प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात प्रेमास नकार दिल्याने तरुणींवर अ‍ॅसिड हल्ला केल्या जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका तरुणावर अ‍ॅसिडहल्ला करण्यात आला आहे. आरोपींचे मुख्य लक्ष्य हे विकास वर्मा नावाचा तरुण होतं त्याच्यावर केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात त्याची आई देखील जखमी झाली आहे. अ‍ॅसिड हल्ल्यात विकासचा चेहरा भाजला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. विकासच्या आईच्या चेहऱ्यावरही अ‍ॅसिडचे काही थेंब उडाले असून ती देखील जखमी झाली आहे. पोलिसांनी हा हल्ला करणाऱ्या 2 तरुणांना अटक केली असून हे दोघेही दिल्लीला पळून गेले होते. या दोघांच्या अटकेनंतर पोलिसांना धक्कादायक गोष्टी समजत गेल्या.

जखमी तरुण विकास वर्मा आणि आरोपी विक्रम उर्फ विक्की यांची फेसबुकवरून मैत्री झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि रोज फोनवरून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. दोघांमधील मैत्री इतकी वाढली की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मन जुळली तशी दोघांची शरीरेही जुळली. दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले होते. मात्र काही काळानंतर विकासने विक्रमकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्याने विक्रमसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. विकासने आरोपीचे फोन घेणं ही बंद केलं होतं, ज्यामुळे ती संतापला होता. त्याने विकासला धडा शिकवायचं ठरवलं होतं. त्याने त्याच्या मित्राला सोबत घेऊन विकास वर्मा याच्यावर अॅसिड हल्ला करण्याचं ठरवलं होतं.

विक्रम आणि त्याच्या मित्राने कारच्या बॅटरीमधलं अ‍ॅसिड काढलं आणि ते विकासवर फेकलं. पोलिसांनी सांगितलंय की आरोपी विक्रम हा बीटेक शिकला असून तो इंडिरिअर डेकोरेटर आहे. त्याचा साथीदार मोहीत कुमार हा यापूर्वी मारामारीच्या प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेला आहे. विक्रमवर मात्र आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाहीये. पोलिसांनी या दोघांना अटक करून तुरुंगात धाडलं आहे.