अपहरण करून पुरोहित तरुणाला तिघांनी लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूजा पाठ करणाऱ्या पुरोहित तरुणाचे तीन जणांनी अपहरण केले, त्याला मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून गुगल पेद्वारे 10000 लुबाडले, तसेच पोलिसात तक्रार दिली तर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी यादरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे पूजा पाठ करण्याचे काम करतात. ते रविवारी रात्री निगडी येथे पूजेसाठी निघाले होते. निगडीला जाण्यासाठी ते भोसरी येथील जुन्या बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी तेथे सफेद रंगाची स्विफ्ट मोटार आली. मोटारीतील एकाने बाहेर उतरुन फिर्यादी तरुणाला मोटारीमध्ये ढकलले. मोटारीत बसल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्याच्या पाकिटातील एक हजार रुपये काढून घेतले. डोळ्यावर पट्टी बांधून त्याला निगडी परिसरात नेले त्याच्या गळ्याला चाकू लावून गुगल पेद्वारे दहा हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याला कुदळवाडी पुलाखाली आणून सोडले. पोलिसात तक्रार दिली तर आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. भोसरी पोलिस तपास करत आहेत.