शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका मित्राला चुकून गोळी लागल्याची घटना घडली, मात्र त्याच्यासोबत शिकारीला गेलेल्या मित्रांना त्याच्या मृत्यूचे दु:ख सहन झाले नाही. म्हणून त्यांनीही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावकरी आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
उत्तराखंड येथील टिहरी जिल्ह्यात राहणारे सात मित्र शनिवारी रात्री शिकार करण्याकरता जंगलात गेले होते. या मित्रांपैकी राजीव (22) या तरुणाकडे गोळ्यांनी भरलेली बंदूक होती. तोच मित्रांच्या गटाचे नेतृत्व करून त्यांना शिकारीला घेऊन गेला होता.
काहीवेळाने जंगलातून चालत जात असताना त्याचा पाय सटकला आणि तो खाली पडला. तेव्हा त्याच्या खांद्यावर असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि त्यातून निघालेली गोळी संतोष नावाच्या मित्राला लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वच मित्र घाबरले. राजीव बंदूक घेऊन पळून गेला. शिकारीला गेलेले पंकज, अर्जुन, सोबन अशा इतर तीन मित्रांमध्ये संतोषचा मृत्यू आपल्याच चुकीमुळे झाला, अशी अपराधाची भावना निर्माण झाली. त्यामुळे किटकनाशक पिऊन या तिघांनी स्वत:ला संपवले.
तसेच राहूल आणि सुनील हे दोघेजण गावात आले आणि त्यांनी गावकऱ्यांना घडलेल्या घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर गावातील लोकांनी किटकनाशक प्यायलेल्या तीन तरुणांना बलेश्वर सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेव्हा पंकज, अर्जुन आणि सोबनला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या दुर्घटनेबाबत, मृत्यू झालेल्या सर्व तरुणांची वये 18 ते 22 दरम्यान होती. सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.




























































