
धारावीमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एका 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच धारावी पोलिसांनी तत्काळ तपास करीत आरोपीला एका तासात गजाआड केले. विमलराज नाडर या तरुणाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जबर मारहाण केल्याने त्याला उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र विमलराज याचा मृत्यू झाल्याने तशी माहिती रुग्णालयातून धारावी पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय माने, एपीआय वैभव कदम यांनी वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास सुरू केला.
पोलिसांनी विमलराज याला ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा आरोपी कोण ते स्पष्ट झाले. मग त्यानंतर झटपट कारवाई करत पोलिसांनी मल्लेश चितकंडी (32) याला तासाभरात पकडले. चितकंडी याचे विमलराज याच्यासोबत आधी वाद झाला होता. त्याच वादातून चितकंडी याने विमलराजच्या डोक्यात स्टंपने मारहाण केली.

























































