
इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल 2021) 14 वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. जगभरातील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या लीगमध्ये खेळण्यासाठी देश-विदेशातील खेळाडू सज्ज आहेत. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देशासाठी खेळण्याऐवजी एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यास प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना संघातून डच्चू द्यायला हवा, असे विधान मायकल वॉन याने केले आहे.
मायकल वॉन याने ‘द टेलीग्राम’ममध्ये याबाबत लिहिले असून इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर अॅश्ले जाईल्स यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहितीही दिली आहे. अॅश्ले जाईल्स यांनी इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी देशासाठी खेळण्याला जास्त महत्त्व देत नसल्याची शक्यता वर्तवली आहे.
मायकल वॉन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, अॅश्ले जाईल्स यांनी बीबीसीच्या शोमध्ये याबाबत वक्तव्य केल्याचे निदर्शनास आणून दिले. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंशी इंग्लंड क्रिकेट बोर्ड वाद घालू इच्छित नाही, असे अॅश्ले जाईल्स म्हणाले होते. कारण यामुळे खेळाडू आणि बोर्डामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे चुकीचा संदेश जात असल्याचे मायकल वॉन याने म्हटले आहे.
जर एखादा 26 ते 27 वर्षाचा इंग्लंडचा खेळाडू माझ्याकडे आला आणि इंग्लंडच्या संघाऐवजी फ्रेंचायजी क्रिकेट किंवा आयपीएलची निवड करत असल्याचे सांगू लागल्यास माझे उत्तर ठरलेले असेल. मी त्याला थेट गुडबाय करेन, असेही मायकल वॉन याने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. मात्र असे होऊ नये असे वाटत असेल तर इंग्लंडने आपल्या प्रमुख खेळाडूंसोबतचा करार 2 ते 3 वर्षांनी वाढवायला हवा, असेही मायकल वॉनने नमूद केले आहे.




























































