
- युगा सावंत
हसू, आसू, प्रेम, सेवा, भावना आणि बुद्धी या अशा फक्त मानवालाच मिळालेल्या देणगीचा उत्तम उपयोग करून इतर प्राणिमात्रांहून काहीतरी वेगळं या मानवीय जन्मातून आपल्याला साध्य करायचं आहे. त्यातूनच आत्मउन्नत्ती साधता आली तर सोन्याहून पिवळं असेल. हा एक साधा सोपा प्रवास. मानवाचा तो स्थायिभावच असावा. निसर्गाचं गणित, त्याची इच्छा, त्याचं प्रेम सहज म्हणूनच त्याचा उद्देशही आपल्या आयुष्यात सहज मुरलेला असावा.
निसर्ग…हे ऐकल्यावर मनात सर्वप्रथम येतं ते वाहणारं सुंदर स्वच्छ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश, निरोगी थंडगार हवा, भरपूर झाडं, प्राणवायू ऑक्सिजन आणि या अशा हिरव्या गर्द वातावरणामुळे आनंदी असणारी आपली पृथ्वी. नियमित लयीत सुरू असणारं ऋतुचक्र, आनंदी जीवजंतू, पशुपक्षी. निसर्गाच्या या नियमिपणामुळेच आज मानवाचं जीवन सुखकर सोपं झालं आहे. धनधान्य यांनी समृद्ध निसर्गामुळेच प्रत्येक घरात चूल पेटते आहे. अग्नितत्त्व प्रसन्न आहे आणि मानवाचा जठराग्नी शांत होतो आहे.
खरंतर भूक ही आपल्याला कार्यरत ठेवण्याचं खूप मोठं काम करते. न भागलेली भूकच आपल्याला आपलं ध्येय गाठायला प्रेरित करते आणि तीच भूक भागली तर आपण योग्य निर्णयाचं अवधान दाखवू शकतो. आजही भूकच आपल्याला आपले शिक्षण, नोकरी, लग्न, कुटुंबव्यवस्था पुढे न्यायला प्रेरित करते आहे.
पण आता ही भूक भूक न राहता हव्यास होत चालली आहे.
प्रगतीचं मर्म भूक न राहता लाइफ स्टाइल होत चाललं आहे. आजची पुढारलेली सुशिक्षित पिढी पुढच्या सात पिढय़ांची भूक भागवायच्या प्रयत्नात आहे आणि हे निसर्गाला धरून नाही. हे त्याला ओरबाडून त्याची रया घालवून त्याला गृहीत धरणं झालं.
ही आजची विषाणूने बेजार झालेली परिस्थिती आपण का भोगतो आहोत? त्याचं कारण पिंडी ते ब्रह्मांडी हेच आहे.
निसर्गाने पैशालाच सर्वस्व मानणाऱ्या माणसाला त्याच्याच भाषेत दिलेलं हे उत्तरं आहे.
जाणिवा विसरून गेलेल्या मानवाला जाणिवा जवळ नेणारा हा काळ आहे.
आजकाल आपल्याला सगळय़ांनाच निसर्ग एक मोठा धडा शिकवतो आहे. काहींना तो यातही जगण्याचा सुखकर मार्ग दाखवतो आहे. काहींची अगदी पळता भुई थोडी होते आहे. मानवाची विस्मृतीत गेलेली माणुसकी त्याला हे असं सत्य दाखवून, नव्हे बघायला लावून निसर्ग आपल्यातला माणूस जागा करतो आहे. आपण निसर्गाचाच अविभाज्य भाग आहोत खरंतर. आपल्याला त्याने नेमून दिलेलं आपलं काम आपलं कर्म आपण चोख बजावायचं आहे. शक्य तितका प्रयत्न करून या संपूर्ण जगासाठी प्रार्थना करून त्यांना शक्य तितकी मदत करून सेवाभाव जतन करायचा आहे. हसू, आसू, प्रेम, सेवा, भावना आणि बुद्धी या अशा फक्त मानवालाच मिळालेल्या देणगीचा उत्तम उपयोग करून इतर प्राणिमात्रांहून काहीतरी वेगळं या मानवीय जन्मातून आपल्याला साध्य करायचं आहे. त्यातूनच आत्मउन्नत्ती साधता आली तर सोन्याहून पिवळं असेल. एक साधा सोपा प्रवास होता. मानवाचा तो स्थायिभावच (Nature) होता. निसर्गाचं गणित, त्याची इच्छा, त्याचं प्रेम सहज होतं. त्याचा उद्देश आपल्या आयुष्यात सहज मुरलेलाही होता.
…पण आपण तो मोठं होण्यात, यशस्वी होण्यात, फेमस होण्यात, श्रीमंत होण्यात, अति महत्त्वाकांक्षी होण्यात कुठेतरी गमावून बसलो आहोत. या ‘अति’ ला जबाबदार कोण? उत्तरं स्वतः ला द्यायचं आहे.
सध्या सततची चढाओढ, लहानपणापासून अगदी सहज केली जाणारी तुलना, नुसतं कशाच्या तरी मागे पळत राहणं हे उद्दिष्ट झालंय का आपलं? कोणाला दाखवायचं आहे? कोणासाठी धावतो आहे? मला काय हवंय नेमकं? हे प्रश्न आता डोकं वर काढणार आहेत.
काय उत्तर आहे आपल्याकडे या प्रश्नांचं…खोटी स्तुती, आपल्याला आवडेल अशाच विचारांच्या व्यक्तींचा गोतावळा. तू माझं कौतुक कर तर मी तुझं करीन ही अगदी सामान्य झालेली बाब तर घातक ठरली नाही?
आपल्याला सत्य सांगणारी, त्यासाठी जिवाचं रान करणारी माणसं नको आहेत. त्यांनी सत्य सांगितलं की कुठल्याही विचारमंथनाआधी आता ‘डिप्रेशन’ जवळचं झालंय. सत्य सांगायची चोरी आहे. विचारा स्वतःला, आपण खरी उत्तरं देतो? दिलेली ऐकू इच्छितो? खरी स्तुती करतो? घरातल्या लहान मुलांना घरची खरी स्थिती सांगतो का आपण? आतला आवाज ऐकतो का आपण? इतरांचं राहू दे, स्वतः स्वतःचं सत्य बघू, ऐकू, समजू, पचवू आणि माफ करू शकतो आहोत आपण? उत्तर स्वतःला द्यायचं आहे…. मला कुणीतरी कसोशीने सत्य सांगत होतं, मी मनावर घेतलं नाहीये… हो असंच झालंय. मनाने पण होकार भरला…
सत्य सांगायची वेळ निघून गेली का? की आपण घालवली? थांबता येतंय का या प्रश्नाजवळ मला?
आता तुम्हाला मनाने दिलेलं उत्तर मला माहिती आहे.
निसर्गमित्र होऊन भरभरून देत होता निरपेक्षपणे. आपण लक्ष दिलं नाही. आपण सत्य ऐकू शकलो नाही, आपण पचवूही शकत नाही आहोत. कारण परिकल्पना
‘मी’ मधे रममाण झालेल्या परिकल्पना.
या परिकल्पना आता तरी बदलून बघूया.?
नेमकं काय करू शकतो… तर,
पुन्हा स्वतःच्या मुळांशी जाऊन प्रवासाचे, निर्णयांचे, स्वतःचे आभार मानूया. केलेल्या वा घडलेल्या चुकांसाठी स्वतःला माफ करूया. मनोमन आपल्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानूया. आपली दिशाभूल करणाऱ्यांचे आभार मानूया. त्यांना माफ करूया.
निसर्गाला शरण जाऊया आणि प्रार्थना करूया सर्वांसाठी मनोभावे….
‘उबुंटू’ चित्रपटातल्या प्रार्थनेच्या ओळी आठवताहेत…
…हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…
हीच अमुची प्रार्थना…
(लेखिका पास्ट लाईफ रिग्रेशन थेरीपिस्ट आहेत)


























































