
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठी माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर इंग्रजीची सक्ती करू नका अशी मागणी युवासेनेने बुधवारी मुंबई विद्यापीठाकडे केली. मराठी माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषांतराचा जाचक नियम त्वरित रद्द केला जावा असे निवेदन युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाला दिले.
मुंबई विद्यापीठात मराठी भाषेची गळचेपी होत असून मराठीतून पीएचडी करणाऱयांना विद्यापीठाने आपले दरवाजे बंद केले आहेत. विद्यार्थ्यांना विषय मान्यतेचा प्रस्ताव मराठीबरोबर इंग्रजीतून द्यावा लागत आहे. इतकेच नव्हे तर प्रबंध सादर करण्याचा 10 टक्के भाग इंग्रजीतून भाषांतरित करून द्यावा लागत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना लाखोचा भुर्दंड पडत आहे. दैनिक ‘सामना’ने विद्यार्थ्यांच्या या समस्येला वाचा फोडली होती.
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनेवरून युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर, ऍड. वैभव थोरात, निखिल जाधव, मिलिंद साटम, धनराज कोहचाडे, युवासेनेचे कैलाश पालकर यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुळकर्णी यांची भेट घेतली. मराठीतून पीएचडी करणाऱया विद्यार्थ्यांकडून इंग्रजीतून भाषांतर करून घेऊ नये तसेच विषय मान्यता प्रस्ताव आणि प्रबंधही इंग्रजीतून सादर करण्याची आवश्यकता नाही असा ठराव विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी का होत नाही, याबाबत सिनेट सदस्यांनी कुळकर्णी यांना विचारणा केली. त्यावर महाराष्ट्राबाहेरील परीक्षकांच्या सोयीसाठी इंग्रजीतून उतारे घेतले जात असल्याचा दावा कुळकर्णी यांनी केला आणि त्याबाबत फेरविचार करून नवा प्रस्ताव शैक्षणिक परिषद व आरआरसी कमिटीमध्ये ठेवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
























































