
मागील चार वर्षांत मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱया अनेक समस्यांबाबत विद्यापीठ प्रशासन, विविध शिक्षण मंडळे आणि सरकार दरबारी तसेच राज्यातील सर्व विद्यापीठाचे कुलपती, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे युवासेना माजी सिनेट सदस्यांनी आतापर्यंत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र एकदाही राज्यपालांकडून सकारात्मक प्रतिसाद अथवा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून महाराष्ट्राच्या अकार्यक्षम कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. युवासेना माजी सिनेट सदस्यांनी राजीनामा देण्याची मागणी थेट राज्यपालांकडेच पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात चार वर्षे राज्यपालपदी विराजमान असूनही कोश्यारी यांना येथील समाजसुधारक व थोर व्यक्तींचा अभ्यास करता आला नाही. तसेच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे, असा आरोप करीत युवासेनेने राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एमएमआरडीएने विद्यापीठाची जागा प्रकल्पासाठी अधिग्रहीत केली आहे. त्याबदल्यात एमएमआरडीने विद्यापीठाला विकासासाठी भरीव रक्कम देणार आहे. मात्र अद्याप ही रक्कम विद्यापीठाला मिळालेली नाही. प्रवेशप्रक्रिया आणि परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत वारंवार निवेदने देऊनही कुलपती या नात्याने आपण कोणतेही उत्तर देत नाही. या गोष्टींचीही नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.
सोमय्या पिता-पुत्रांच्या पीएचडीबाबत गप्प का?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपालांनी वेळोवेळी ठोस भूमिका घेतली. प्रसंगी प्रशासनाला धारेवरही धरले. मग आता सोमय्या पिता-पुत्रांच्या पीएचडीबाबत राज्यपाल गप्प का, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच पुत्र नील सोमय्या यांच्या डॉक्टरेट वादग्रस्त आहेत. किरीट यांचे प्रबंध विद्यापीठातील कोणत्याही खात्यात अजूनही सापडत नाहीत. नील यांची पीएचडी फक्त 14 महिन्यांत पूर्ण झाली. त्यामुळे विद्यापीठाची सोमय्यांवर विशेष मेहरबानी असल्याची शंका युवा सेना माजी सिनेट सदस्यांनी व्यक्त केली.



























































