
बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळावर मशाल आहे. मुंबईत हुतात्मा चौक येथे देखील धगधगती मशाल आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी त्यावेळी जशी त्यांनी धगधगती मशाल हातात घेतली होती, तीच मशाल आम्ही आता महाराष्ट्र वाचवण्यासाठी हातात घेणार आहोत. असे परखड मत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेला नवे चिन्ह मिळाल्यानंतर ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
यावेळी ते म्हणाले की पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळालेलं आहे. ते आम्ही देशभरात लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावात शिवसेना आहे, आणि गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री पदावर राहून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात एका कुटुंब प्रमुखाप्रमाणे काम केलेलं आहे. म्हणूनच त्यांना ही ओळख मिळाली असून ते प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आणि त्यांच्याच नावापुढे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देखील आहे. त्यामुळे हेच नाव, हेच प्रेम आम्ही प्रत्येक घराघरात घेऊन जाणार आहोत.
अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत शिवसेनेचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल. शिंदे गटाचे बाळासाहेब नेमके कोणते? बाळासाहेब ठाकरेंचं नाव हे खऱ्या शिवसेनेला मिळालं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावातच त्यांचं नाव आलं आहे. त्यामुळे त्यांचे बाळासाहेब कोणते हे आम्हाला माहीत नाही. कारण ते कुठूनही काहीही चोरतात. त्यांनी नाव चोरण्याचा प्रयत्न केला, चिन्ह देखील चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रात कितीही असे प्रकार झाले, तरी महाराष्ट्रातील व देशातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या मागेच उभे राहील. कारण आम्ही जे काम केलं आहे ते लोकांसमोर आहे आणि आम्ही सत्याच्या बाजूने आहोत. असे ते म्हणाले.
सत्तेत असताना आम्ही चांगलं काम करत होतो, महाराष्ट्रात सगळ्यांना एकत्र पुढे घेऊन जाण्याचे काम करत होतो. गेली दोन-तीन महिने महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे. हे सरकार केवळ राजकीय कामे करत आहे. दुसरा पक्ष कसा फोडता येईल यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे. चांगलं काम कसं होईल जनतेची सेवा कशी होईल याकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. या सरकारला स्वतःची अशी काही ओळख नाही. खोके सरकार हीच त्यांची ओळख आहे म्हणून ते आमची ओळख चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. काल जो निकाल आला त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. वार करायचा असेल तर तो समोरून करा मागून करू नका. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क असे उद्योग महाराष्ट्र बाहेर जाऊन येथील एक लाख तरुणांवर अन्याय झाला आहे. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.






























































