युवराज पुन्हा पंजाबसाठी खेळणार, पंजाब क्रिकेट असोसिएशनकडून पुनरागमन करण्याची विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yuvraj-singh

हिंदुस्थानच्या दोन वर्ल्ड कप विजेतेपदाचा शिलेदार… लढवय्या… सिक्सर किंग… अशा विविध उपाध्यांनी ओळखला जाणारा युवराज सिंग पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी पुनित बाली यांच्या विनंतीनंतर युवराज सिंगने निवृत्तीमधून बाहेर येत क्रिकेटच्या रणांगणात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सेक्रेटरी जय शहा यांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे. यामध्ये त्याने फक्त पंजाबसाठीच खेळायला मिळायला हवे असे नमूद केले आहे.

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग यांच्या सोबत नेटमध्ये सराव करीत असताना युवराज सिंगला अजूनही आपल्यामध्ये क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचे जाणवले. तो यावेळी म्हणाला, या सर्व खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज आहे. माझ्याकडून त्यांना मोलाच्या टिप्स मिळू शकतात. याचसह मधल्या काळात क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही मी चांगली फलंदाजी करीत होतो. त्यामुळे पंजाबसाठी क्रिकेट खेळायला हरकत नाही, असे युवराज सिंगला वाटते.