पाळेकरांचा ‘झीरो बजेट शेती’चा फॉर्म्युला देशभरात!

41

सामना प्रतिनिधी । अमरावती

अमरावतीकर कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुभाष पाळेकर यांचा झीरो बजेट शेतीचा फॉर्म्युला संपूर्ण देशभरात राबवला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक शक्यतांची पडताळणी करण्याचे निर्देश राष्ट्रीय नीती आयोगाने सर्व राज्य सरकारांना दिले. हिमाचल, आंध्र, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांनी झीरो बजेट नैसर्गिक शेती पद्धती अंमलात आणली असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी काढून ते कर्जमुक्त झाले आहेत.

डॉ. पाळेकर यांचा फॉर्म्युला राष्ट्रीय पातळीवर स्वीकारला जाणे ही अमरावतीकरांसाठी गौरवाची बाब असून, पाळेकर सध्या राजधानी दिल्लीत नीती आयोग, केंद्रीय कृषी मंत्रालय तसेच कृषी अनुसंधान परिषदेच्या वर्तुळातील तज्ज्ञांसोबत काम करीत आहेत. दरम्यान, आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीवकुमार म्हणाले, झीरो बजेट नैसर्गिक शेतीतूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करता येईल, या डॉ. पाळेकर यांच्या संकल्पनेचा नीती आयोगाने अभ्यास केला आहे. अधिकाऱ्यांनी या शेतीची पाहणीही केली. सर्व राज्यांनी ही पद्धती राबवावी. त्यासाठी आयोग पूर्ण सहकार्य करील, अशी ग्वाही राजीवकुमार यांनी दिली. नीती आयोगाच्या मुख्यालयात नुकत्याच झालेल्या एका परिषदेत डॉ. पाळेकर सहभागी होते. आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीवकुमार, इतर संचालक, तज्ञ मान्यवर व अधिकारी यावेळी उपस्थित होते. झीरो बजेट शेती करणारे आंध्र प्रदेशातील १० शेतकरी प्रतिनिधीही परिषदेस उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या