आम्ही खवय्ये – अभिनेत्री मयुरी देशमुखचा शाकाहार

अभिनेत्री मयुरी देशमुख शाकाहारसुद्धा टेस्टदार असू शकतो हे ती छान पटवून देते.

खाणंया शब्दाची तुझ्या दृष्टीने व्याख्या काय?

आपल्यासमोर असं काहीतरी येतं की, जे आपल्या सगळ्या पंचज्ञानेंद्रियांना समाधान देतं. फक्त पोट भरणं महत्त्वाचं नसून खाण्याचा व्यक्तीच्या आध्यात्मिक, मानसिक आयुष्यावरही परिणाम होत असतो.

खायला काय आवडतं ?  –

मी संपूर्णतः शाकाहारी आहे. कारल्याची आणि शेपूची भाजी सोडली तर मला शाकाहारातले सगळे पदार्थ मनापासून आवडतात. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यासोबत परदेशातील पदार्थही मी खूप चवीचवीने खाणारी मुलगी आहे.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेते?

जे पदार्थ आवडतात ते पौष्टिक कसे बनतील याकडे माझं लक्ष असतं. म्हणजे भजी, वेफर्स चांगल्या तेलात तळलेली असावी. प्रमाणात खाणं आणि कुठल्या वेळी खातेय याकडे लक्ष देते. बिस्किटही गूळ, तूप आणि गव्हापासून छान बनतात. सगळे दिवाळीचे पदार्थ चांगल्या तुपात केले तर ते पौष्टिक बनतात.

डाएट करते का ?  –

करत नाही, पण जे आरोग्यासाठी चांगलं आहे ते खाते. माझी जीवनशैली अशी केलीय की, सगळं खायचं, पण जरा प्रमाणात खायचं. त्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. खाण्याच्या मोजमापावर नियंत्रण हवं असं वाटतं.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खातेस ? –

चित्रीकरण करत असेन बाहेरच खावं लागतं, पण मुंबईत महिनाभर नाटकाचे प्रयोग असतील तर घरून डबा घेऊन जाते. बाहेरचं खाणं कटाक्षाने टाळते, कारण ठराविक पदार्थच बाहेर विकत मिळतात. त्यापेक्षा महिना-दोन महिन्यातून एकदा बाहेर खायला जावसं वाटतं. त्याची मजा काही औरच असते.

कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं? –

दादर चौपाटीला टरटुलिया हॉटेल आहे. इथे इतका अप्रतिम व्हेज पिझ्झा मिळतो जो मी आतापर्यंत कुठल्याही हॉटेलमध्ये खाल्ला नाही.

कोणतं पेय आवडतं? –

ऋतुमानानुसार उन्हाळ्यात पन्ह, एरवी ताक किंवा कधीतरी नारळपाणी, सोलकढी आवडते. शिवाय ठिकाणानुसार कोणतं पेय प्यायचं हे ठरवते. एअरेटेड ड्रिंक आणि कॅनमध्ये मिळणारी ज्युसेस शक्यतो मी पीत नाही.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणंपिणं कसं सांभाळता? –

तेव्हा काही सांभाळत नाही, कारण माझ्यासोबत संजय मोने असतात. ते प्रचंड खवय्ये आहेत. त्यांना खाण्याबाबत प्रचंड माहिती आहे. कुठे कोणता पदार्थ चांगला मिळेल हे तेच मला सुचवतात. ते मी खाते.

दौऱयानिमित्त आवडलेला वैशिष्टय़पूर्ण पदार्थ? –

इंदोरच्या खाऊगल्लीत खाल्लेलं बुट्टे का किस आणि मालपोहे फारच लाजवाब होते.

स्ट्रिट फुड आवडतं का ? –

प्रचंड आवडतं. पाणीपुरी खूपच आवडते.

स्वयंपाकातील काय खायला आवडतं ?

सणासुदीच्यावेळी पुरणाचं जेवण आणि इतरवेळी आईच्या हातचा आमटी-भात.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवतेस तेव्हा आवर्जून काय खायला घालतेस? –

मी उत्तम पास्ता किंवा रिसोटो बनवते.

पास्ता

घरी पौष्टिक पास्ताही बनवता येतो. पास्ता उकळवताना पाण्यात तेल आणि मीठ घालायचं. म्हणजे तो एकमेकांना चिकटत नाही. साधारण 15 मिनिट पास्ता उकळल्यानंतर चाळणीत काढून काही वेळ थंड पाण्याखाली धरायचा. त्यानंतर सॉस आणि भाज्यांची तयारी करायची. त्यासाठी ब्रोकोली, बेबीकॉन, लाल-पिवळी भोपऴी मिरची बारीक चिरून त्यावर मीठ,मिरी, लसूण घालायचं. सॉससाठी पालक आणि बेसनमध्ये मीठ, आलं, लसूण पेस्ट घालून त्याची प्युरी करायची. त्यात बदाम, अक्रोड किंवा चीझ-सायही घालू शकता. नंतर हे तीनही पदार्थ एकत्र करून वाफ द्यायची. आवडीनुसार ओsरेगॅनो,चिली फ्लेक्स घालायचे.

आपली प्रतिक्रिया द्या