मराठी भाषा आणि अभिजात दर्जा

सतीश बडवे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख)

ग्रंथधन मराठीचे पुरावे बाराव्यातेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधूयांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. पण त्याचवेळी काही अभ्यासकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, भाषेच्या आरंभकालीन एवढय़ा प्रगत रचना व लेखनाचा उच्च दर्जा कसा आला? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे तर प्राचीनतेकडे झुकावे लागते आणि मौखिक परंपरांचा शोध घ्यावा लागतो. मराठीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्रीपर्यंत जाऊन भिडते. आजची मराठी व तिचे असणारे मूळ अशा व्यापक पदावर विचार करावा लागतो.

मराठी भाषा हा मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवरूनही प्रयत्न झाले आहेत. हा दर्जा आपल्याला मिळणे ही मराठी माणसाच्या जीवनातली एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काही कसोटय़ा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मराठी भाषा या कसोटय़ा निश्चितपणे पूर्ण करते. केंद्र सरकारने आजवर हिंदुस्थानातील सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या त्या सहा भाषा आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.

महाराष्ट्र शासनही या कामासाठी सक्रिय आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अभिजात मराठी भाषा (१०  जानेवारी २०१२) रोजी स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करून पुरावे गोळा करण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले. प्रा. पठारे यांच्यासमवेत हरी नरके व अन्य काही सदस्य या समितीत आहेत. या समितीने केलेले काम महत्त्वाचे आहे. हे काम कोणत्या स्वरूपाचे  आहे हे ध्यानात घेण्यासाठी एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने कोणते निकष ठरविले आहेत. हे बघणे आवश्यक ठरते. त्यातून अभिजात भाषा हा दर्जा मिळविण्यासाठी या समितीने केलेला अभ्यास व मराठी भाषाविषयक संशोधन सिद्ध करण्याची समितीची भूमिकाही ध्यानात येऊ शकते. हिंदुस्थान हे बहुभाषिक राष्ट्र आहे. हिंदुस्थानची विविधता लक्षात घेण्यासाठी भाषांचे वैविध्य हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. केंद्र शासनाने ठरविलेले निकष पुढीलप्रमाणे आहेत.

एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचे निकष :

  • भाषेची प्राचीनता
  • भाषेची मौलिकता आणि सलगता
  • भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण
  • प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱया खंडासह जोडलेले/असलेले नाते

या सर्व निकषांवर उतरणारी अथवा हे सर्व निकष पूर्ण करणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा विचार कसा करता येतो हे या समितीने दाखवून दिलेले आहे. मराठीचे प्राचीनत्व व त्यासंबंधीचे पुरावे अभ्यासून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. १२ जुलै २०१३ रोजी हा अहवाल मराठीतून सादर करण्यात आला. इंग्रजीतील यासंबंधीचा अहवाल १६ नोव्हेंबर २०११ रोजी केंद्राला सादर झालेला आहे.

प्रस्तुत अहवालात मराठी भाषेचे प्राचीनत्व उपलब्ध पुराव्यांसह मांडण्यात आले. मराठी भाषेची असणारी प्राचीन परंपरा त्यात सूचित करण्यात आली आहे. गंथधन मराठीचे पुरावे बाराव्या-तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. पण त्याचवेळी काही अभ्यासकांनी असा प्रश्न उपस्थित केला की, भाषेच्या आरंभकालीन एवढय़ा प्रगत रचना व लेखनाचा उच्च दर्जा कसा आला? या प्रश्नाचे उत्तर शोधायचे तर प्राचीनतेकडे झुकावे लागते आणि मौखिक परंपरांचा शोध घ्यावा लागतो. मराठीचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्रीपर्यंत जाऊन भिडते. आजची मराठी व तिचे असणारे मूळ अशा व्यापक पदावर विचार करावा लागतो. कारण तेव्हापासून आजपर्यंत हा एकाअर्थी मराठीच्या बदलाचा इतिहास आहे. जैन महाराष्ट्रीमध्ये समराधिक्याची कथा येते. तेथपर्यंतही आपण मागे जाऊ शकतो. प्राचीनत्वाच्या या शोधात सातवाहनांच्या कालखंडात वाङ्मयाच संदर्भातील आधार शोधणे आवश्यक ठरते. एका महत्त्वाच्या गंथाचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. तो गंथ म्हणजे ‘गाथासप्रशती’ (किंवा गाथासत्सई) त्यात येणारे उल्लेख गंगथडीचे अथवा गोदाकाठच्या प्रदेशातले आहेत. कला आणि विद्या या क्षेत्रातील भरभराट सातवाहनांच्या काळातच झाली आहे. ‘गाथसप्रशती’ हा सम्राट हालाचा ग्रंथ आणि त्याचा मंत्री गुणाढय़ याचा ‘बृहत् कथा’ हे दोन ग्रंथ या राजवटीशी निगडित आहेत. सातवाहनांची राजवट इसवी सन पूर्व २३० पासून जवळपास ४००-४५० वर्षांची आहे. प्रतिष्ठान (म्हणजे पैठण) ही त्यांची राजधानी होती. नंतर वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव अशी राजघराणी सत्तेवर होती. चालुक्यांच्या काळात ‘मानसोल्लास’ हा ग्रंथ लिहिल्याचे आढळते. पुढे यादवकाळात महानुभाव, वारकरी या धर्मसंप्रदायांनी विपुल रचना केल्याचे दिसते. भाषेची मौलिकता व सलगता यादृष्टीने याचा विचार करता येतो. त्याचप्रमाणे मराठीच्या भाषिक आणि वाङ्मयीय परंपरेचे विकसनही ध्यानात घेता येते. या राजवटीचे कालखंड वेगवेगळे असले तरी मराठीचा विकास टप्प्याटप्प्याने कसा होत गेला याचे काहीएक चित्र स्पष्ट होत जाते. मराठीचे हे प्राचीनला मौलिक असून तिचे रूप स्वाभाविकपणे कसे बदलत गेले हेही ध्यानात येते. प्राचीन कालखंडापासून थेट आजच्या आधुनिक भाषेच्या विकासाची दिशा ध्यानात येऊ लागते.

या दीर्घकाळाचा इतिहास समजून घेण्यासाठी प्राचीन काळातील अभिलेख आधारभूत ठरतात. कारण या अभिलेखांमधील भाषा तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचे वर्णन करणारी असते. कै. दिनेशचंद्र सरकार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. शोभना गोखले यांनी केला आहे. ‘भारतीय लेखविद्या’ या ग्रंथातून अभिलेखाशास्त्र्ााची अंगोपांगे लक्षात येतात. शिलालेख अथवा कोरीव लेख ही अस्सल संशोधन साधने आहेत. लेण्याद्रीजवळचा शिलालेखही मराठी भाषेसंदर्भात काही बोलू पाहणारा आहे. हे सर्व बघितले की, मराठी भाषेचे प्राचीनत्व व मौखिक साहित्याची निरंतर वा सततची परंपरा आढळून येते. या भाषेची प्राचीन रूपे व त्यांचा आजच्या मराठीशी असणारा आंतरिक संबंधही उलगडता येतो. श्री. व्यं. केतकर, राजारामशास्त्र्ााr भागवत, वि. भि. कोलते, ऍन फेल्ड हाऊस यांच्या संशोधनपर लेखनातूनही मराठी भाषेच्या प्राचीनत्वाच्या खुणा सापडतात. दोन हजार वर्षे जुनी असणारी ही मराठी भाषेची परंपरा आहे. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे केंद्र सरकारचे निकष मराठी भाषा पूर्ण करते हे या विवेचनावरूनही ध्यानात येईल.
प्रा. रंगनाथ पठारे समितीने जो अहवाल सादर केला तो मराठी भाषा विभागाच्या http://marathibhasha.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘अंतर्गत संस्था’ या दुव्यावर (लिंकवर) उपलब्ध करून देण्यात आला आहे. साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांच्याकडेही तो अहवाल पाठवला गेला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील मराठी विभागांनी व मराठी भाषाप्रेमींनी साहित्य अकादमीच्या अध्यक्षांना पत्राद्वारे अथवा स्वतंत्र स्वाक्षरी मोहीम राबवून मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करावा यासाठी पत्राद्वारे मागणी केलेली आहे. हा दर्जा आपल्या मायबोली मराठीला मिळणे ही प्रत्येक मराठीप्रेमी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट असेल. त्या दिवसाची आपण वाट पाहत आहोत.

 

आपली प्रतिक्रिया द्या