
>> डॉ. कैलास दौंड
उमेश मोहिते हे मराठीतील एक सशक्त कथाकार म्हणून सर्वांना परिचित आहेत. ‘जागरण’, ‘वळख’, ‘निवद’ या कथासंग्रहातील कथा वाचकांना आवडलेल्या आहेत. त्यांच्या ‘वळण’ आणि ‘बांधवणूक’ या कादंबऱयादेखील त्यांच्या लेखनशैलीची साक्ष देतात. दर्जेदार अनोखा आशय नि कलात्मक मांडणी हा त्यांच्या लेखनाचा विशेष. आता त्यांचा ‘भाकरी आणि कर्म’ हा कथासंग्रह कबनूरच्या तेजश्री प्रकाशनकडून प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहात ‘भाकरी’, ‘घात’, ‘पाऊस’, ‘स्थापना’ आणि ‘कर्म’ या पाच लघुकथा आहेत. मोहिते यांनी हा प्रकार सशक्तपणे हाताळला आहे. या कथांमधून अभावाच्या आणि दुःख भोगाच्या विविध छटा व सूक्ष्म कंगोरे अनुभवायला मिळतात.
‘भाकरी’ ही या कथासंग्रहातील पहिली कथा. गरीब आई-वडिलांची मुलगी पारबती हिला तिचे वडील गरीब आहेत म्हणून सासरी कसा त्रास दिला जातो याची ही कथा आहे. जणू गरीब असणे हा त्याचा गुन्हा आहे. अधिकची कामे करून घेतात, तिला अपमानित करतात. ‘घात’ कथेत मानलेल्या नात्यावर खरे नाते मात करत असल्याचे दाखवणारी कथा आहे. सुवर्णा ही सोपानराव या गरीब शेतकऱयाची मुलगी. सोपानरावचा झाडावरून पडून पाय अधू झाल्यावर त्याने दुकान टाकलेले. ज्यांची शेती कसताना झाडावरून सोपानराव पडले ते देशमुख सर सुवर्णाला मुलगी मानतात.
‘स्थापना’ ही गावपातळीवरील राजकारणाची झलक दाखवणारी कथा आहे. आपले राजकीय वर्चस्व अधोरेखित करण्यासाठी यशवंत गावात दरवर्षी बसणारा गणपती आपल्या गल्लीत बसवायचा निश्चय करतो. गावागावांत दिसणाऱया अशा संघर्षाचे नेटके चित्र लेखकाने रेखाटले आहे. ‘कर्म’ या कथेत सटवा या दारूडय़ा नवऱयाच्या व्यसनाला वैतागलेल्या गयाच्या जगण्याची तिला रंजिस आणणारी हकिकत आहे. गरिबीमुळे गया रोजंदारीने कष्टाचे काम करते. तिचा मुलगा पंडित हाही तिच्या सोबतच कुटुंबाला आधार म्हणून कामाला जातो.
‘भाकरी आणि कर्म’मधील लघुकथा मराठी लघुकथेकडे वाचकांना आकृष्ट करणारी कथा असल्याचे निश्चितच म्हणता येते. या कथासंग्रहातील पाचही कथेतील स्री व्यक्तिरेखा सोशिक, संयमी, जगणे पुढे रेटणाऱया, प्रपंचाचा गाडा जिद्दीने ओढणाऱया आहेत. त्यामानाने पुरुष व्यक्तिरेखा परिस्थितीने हतबल झालेल्या, काहीशा नमलेल्या आहेत. भाकरी, घात आणि कर्म या कथामधील पुरुष व्यक्तिरेखा परिस्थितीने दबलेल्या आहेत. ‘स्थापना’ कथेतील पुरुष व्यक्तिरेखा राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱया आहेत, जगण्यातील अडथळ्यांना भिडणाऱया आहेत. या कथांचे शेवट खूप परिणामकारक आहेत. भाकरी, घात, पाऊस, कर्म या कथांचे शेवट स्रियांच्या भावनाविवशतेने होतात.
या पाचही कथा ग्रामीण भागाशी निगडित आहेत. त्यातून ग्रामीण माणसांची फरफट पाहायला मिळते. दारिद्रय़ आणि दुःखमय जगण्याचे काही कंगोरे या कथातून साकारतात. या आजच्या ग्रामीण लघुकथा आहेत. ‘स्थापना’ या कथेतून गावपातळीवरील राजकारणातून निर्माण झालेल्या संघर्षाची झलक पाहायला मिळते. सहज आणि प्रभावी संवाद, वास्तवदर्शी कथनशैली यामुळे या कथा वाचनीय झालेल्या आहेत. त्या वाचकांच्या संवेदनांना निश्चितच हात घालतील याची खात्री आहे. वाचकांनी व्यापक पट घेऊन येणाऱया या कथा मुळातूनच वाचने आनंदायी ठरेल.
भाकरी आणि कर्म ः लघुकथा संग्रह
लेखक ः उमेश मोहिते
प्रकाशक ः तेजश्री प्रकाशन, कबनूर (कोल्हापूर)
पृष्ठs ः 145, मूल्य ः रुपये 200/-





























































