श्री विठ्ठल मंडळ जिल्हास्तरीय कबड्डी, जयंत काळे, साधना यादव ठरले मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याणच्या शिवशंकर मंडळाने पुरुषांत, तर नवी मुंबईच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज संघाने महिलांत विजेतेपद मिळविले. ओम कबड्डी संघाचा जयंत काळे पुरुषांत, तर छत्रपती राजर्षी शाहू संघाची साधना यादव महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. त्यांना आकर्षक चषक भेट देऊन गौरविण्यात आले. श्री विठ्ठल क्रीडा मंडळाच्या वतीने प्रथम श्रेणी स्थानिक पुरुष व महिला गट स्पर्धेचे ठाण्यातील लोकमान्य नगर येथे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांच्या अंतिम सामन्यात शिवशंकर मंडळाने ओम कबड्डी संघाचा प्रतिकार 30-27 असा मोडून काढत विजेतेपदाचा चषक व रोख रु. अकरा हजार आपल्या नावे केले. उपविजेत्या ओम कबड्डी संघाला चषक व रोख रु. सात हजारांवर समाधान मानावे लागले.

महिलांच्या अंतिम सामन्यात छत्रपती राजर्षी शाहू महाराज संघाने संघर्ष क्रीडा मंडळाचा विरोध 41-37 असा मोडून काढत विजेतेपदाचा चषक व रोख रु. अकरा हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या संघर्षला चषक व रोख रु. सात हजारांवर समाधान मानावे लागले. सुरुवात जोशपूर्ण करीत छत्रपती राजर्षी शाहूने पूर्वार्धात 21-16 अशी आघाडी मिळविण्यात यश मिळविले.

n हनुमान संघाचा साईराज साळवी पुरुषांत, तर छत्रपती राजर्षी शाहू संघाची निशा सिंग महिलांत स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू ठरले. शिवशंकरचा सुमित साळुंखे पुरुषांत, तर संघर्षाची रिंकू पाटील महिलात स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे आणि ओम् कबड्डीचा शरद काळे पुरुषांत, तर ज्ञानशक्ती युवाची निधी रांजणे महिलात स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचे खेळाडू ठरले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्थानिक नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, स्थानिक नगरसेविका-माजी सभापती महिला व बाल कल्याण ठाणे महानगरपालिका राधाबाई सुभाष जाधवर, मंडळाचे अध्यक्ष किरण जाधव, युवा नेते प्रशांत जाधवर, मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सचिव संतोष पाटील, विश्वस्त विक्रम पाथरे, कृष्णा मनवे आदींच्या उपस्थितीत पार पडला.