
- श्री गजानन आशीष
हा विशेषांक श्री गोंदवलेकर महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची महिमा सांगणारा आहे. या अंकात गोंदवलेकर महाराजांची बोधवचने, त्यांचे विचार, त्यांच्या अभंगातील शिकवण, श्री महाराजांची प्रवचने, त्यांच्या कृपेचे व नामाचे अनुभव, गोंदवल्याची प्रश्नमंजुषा यांचा समावेश आहे. याशिवाय कैलास मानसचे अद्भुत रहस्य, श्री व्यंकटेश स्तोत्र उपासना व अनुभव, वैज्ञानिक दृष्टिकोनातून वास्तुशास्त्र, मानसपूजा आदी विषयांचा परिचय करून देणारे लेख आहेत.
संपादक : मनोहर फडणीस
मूल्य : 160 रु., पृष्ठs : 210
- श्री दीपलक्ष्मी
चित्रसार्वभौम रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या देदीप्यमान कारकीर्दीची स्मरण करून देणारा सर्वांगसुंदर विशेष विभाग या अंकाचे खास वैशिष्टय़! या विभागात मुळगावकरांच्या गाजलेल्या काही सुंदर चित्रांसह त्यांच्यावर विविध ठिकाणी गेल्या अनेक वर्षांत लिहून आलेल्या काही निवडक लेखांचा समावेश आहे. यासाठी हेमंत रायकर, मं. गो. राजाध्यक्ष, अनंत देशमुख, रविप्रकाश कुलकर्णी, जयराज साळगावकर, कल्पना सबनीस-मुळगावकर यांनी लेखन केले आहे. याव्यतिरिक्त प्रवीण दवणे यांचा गदिमांवरील रसास्वाद, पु.लं.च्या आठवणी सांगणारा गोपाळकृष्ण भोबे यांचा लेख, पारशी समाजाचे दर्शन घडविणारा प्रवीण कारखानीस यांचा लेख, पर्यटनाविषयी विक्रांत देशमुख तसेच डॉ. श्रीकांत मुंदरगी यांनी सिनेमावरील लेखन वाचायला मिळेल.
संपादक : हेमंत रायकर
मूल्य : 350 रु., पृष्ठs : 304
- आगरी दर्पण
कथा, परिसंवाद, प्रवासवर्णन, विशेष लेख, आत्मकथन, कविता असा उत्तमोत्तम साहित्याचा नजराणा यंदाच्या या अंकात आहे. ‘संवादाशी जडलं नातं’ या सदरात अभिनेत्री स्पृहा जोशी, शर्वरी जेमेनीस, चंद्रशेखर गोखले, संदीप खरे आदींनी आपली प्रांजळ मते मांडली आहेत. ‘कुठं नेतंय आजचं शिक्षण’ या परिसंवादात सुनील कदम, गिरीश प्रभुणे, वैशाली गेडाम, तारा भवाळकर आदी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेली मते वाचकांना अंतर्मुख करणारी आहेत. गझलकार प्रा. प्रदीप निफाडकर यांचा सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यदलाच्या काव्यमय प्रवासावरील लेख वाचकांना वेगळा अनुभव देणारा आहे.

संपादक : दीपक म्हात्रे
मूल्य : 200 रु., पृष्ठs : 176
- आकंठ
यातील कथा, लेख, कविता, कादंबरीचा अंश सगळं राजस्थानी साहित्यातील अनुवादित केलेले आहे. शिवचरण भरतिया, चंद्रसिंह बिरकाळी, करणीदान बारहत, राणीलक्ष्मी कुमारी चुंडावत, सांवर दईया, मूलचंद प्राणेश, मालचंद तिवाडी, मदन सैनी, चेतन स्वामी, कीर्ती शर्मा, यादवेंद्र शर्मा, दुलाराम सहारण, नृसिंह राजपुरोहित अशा अनेक प्रसिद्ध राजस्थानी लेखकांच्या अनुवादित कथा तेथील मातीशी नातं सांगणाऱ्या आहेत. शिवाय प्राचीन राजस्थानी साहित्य परंपरेचा संक्षिप्त परिचय (मनोहर मांदाडकर), डॉ. अर्जुनदेव चारण यांच्या राजस्थानी नाटकाशी संबंधित दृश्यालेख (डॉ. राजकुमार व्यास) हे लेख दर्जेदार आहेत.
संपादक : रंगनाथ चोरमुले
मूल्य : 100 रु., पृष्ठs : 276
- ताऱ्यांचे जग
हा नोबेल पुरस्कार विशेषांक आहे. काही निवडक व्यक्तींच्या अतुलनीय कार्याचा आणि त्यांच्या आयुष्याचा प्रेरक प्रवास या अंकात वाचायला मिळेल. नोबेल पुरस्काराच्या कर्त्याची कहाणी (रविप्रकाश कुलकर्णी), नोबेल पारितोषिकाचा इतिहास (लता गुठे), ग्रॅबिण्टल गार्सिया मार्केझ (गणेश कुलकर्णी), दलाई लामा (माधवी कुंटे), डॉ. लिंडा बक (रामकृष्ण अभ्यंकर), डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ऍड. प्रकाश लब्धे), डॉ. सी. व्ही. रामन (साधना कळेवणकर), आइन्स्टाइन (प्रा. प्रतिभा सराफ), अमर्त्य सेन (राजश्री लोके), गीतांजली, नोबेल आणि काव्यलेणी (गौरी कुलकर्णी), मै मलाला हू (ऍड. व्ही. व्ही. गुठे), सुखदुःखाचा शोध घेणारी टोनी मॉरिसस (रेखा नार्वेकर), अर्नेस्ट हेमिंग्वे (अश्विनी देशपांडे) आदी अंकातील सर्वच लेख दर्जेदार आहेत. देखणे मुखपृष्ठ, सुबक मांडणी, सकस साहित्याने नटलेला हा अंक संग्रही ठेवण्याजोगा!
संपादिका : लता गुठे
मूल्य : 130 रु., पृष्ठs : 118
- अनिता
वैचारिक लेख, ललित लेख, कथा-कादंबरी साहित्य, राजकारण, समाजकारण, मनोरंजन यांची रेलचेल असलेला हा अंक आहे. या अंकात साई निर्वाणाचा घटनाक्रम व बाबांची संवत्सरी, अजातशत्रू वसंत डावखरे, मुख्यमंत्र्यांची चार वर्षं संघर्षाची, याचबरोबर किल्लारीचा भूकंप, अण्णा हजारे अपयशी का?, माळशेज घाटाकडे दुर्लक्ष का?, धनगर नेमके कोण?, राज्याची आर्थिक स्थिती, दुष्काळाचे सावट, शिक्षण क्षेत्राचे दिवाळे, इंटरनेटवर जमलेले विवाह यशस्वी होतात का?, विवाहबाह्य संबंधाचे पडसाद या विषयांचा विस्तृत आढावा घेणारे लेख वाचनीय आहेत. याशिवाय कॉर्पोरेट संस्कृती आणि व्यसनाधीनता, गदिमांच्या आठवणी, श्रीक्षेत्र संगमेश्वरची महती, कामगारांची रंगभूमी या विषयांचा धांडोळा घेणारे लेख माहितीपूर्ण आहेत. यासोबत कादंबऱ्या, कथा, चित्रपरीक्षण, पाककृती, वार्षिक राशीभविष्य यांचाही समावेश अंकात केला आहे.
संपादिका : वैशाली संतोष भानुशाली
मूल्य : 100 रु., पृष्ठs : 128

- शब्द रुची
आपल्याला ठाऊक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची दुसरी बाजू माहीत असतेच असे नाही. ती कळली की माणसाला वाचण्याची अधिक ओढ मनात निर्माण होते. माणसं स्वतःतून कशी बहरत जातात, हे समजून घेण्यातही एक वेगळाच आनंद असतो. मोठय़ा व्यक्तींची ही दुसरी बाजू वाचकांना या अंकातून नक्कीच आनंद देऊन जाईल. या अंकातील ‘कलाविश्व’ या विभागात वाचकांना एका स्वच्छंदी अवलिया कलाकाराची भेट घडेल. कलावंताचे जग हे त्याचे स्वतःचे जग असते. विविध कलांचे अवकाश कलाविश्वमधून वाचकांकरिता साकारण्यात आले आहे. याशिवाय शांततेचं, चांगुलपणाचं, स्वातंत्र्याचं, मोकळ्या विचारांचं, भयमुक्त मनाचं प्रतीक असलेला, आकाशाकडे झेपावण्याचं स्थैर्य बाळगलेल्या चिमुकल्या पक्ष्याशी जुळलेल्या ‘अनुबंधा’चे निवडक रंगही या अंकात वाचायला मिळतील. ‘लढाई अजून सुरू आहे’ या विभागात सामाजिक परिवर्तनासाठी न्याय, हक्क आणि तत्त्वांसाठी लढणारी माणसे आणि त्यामुळे समाजाला मिळालेलं बळ याविषयीचे लेखही वाचनीय आहेत. समाजाच्या वाटचालीतले माणसांचे देणे हा सांस्कृतिक ठेवा ‘ग्रंथाली’ने यावर्षीही जपला आहे.
संपादक : सुदेश हिंगलासपूरकर
मूल्य : 180, पृष्ठs : 216



























































