
नववर्षपाटर्य़ाच्या अनुषंगाने ड्रगची विक्री करू पाहणाऱया ड्रग पेडलरला मुंबई पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी कक्षाने चांगलाच दणका दिला आहे. वरळी आणि वांद्रे युनिटने कारवाई करून सुमारे 1 कोटी 35 लाखांचे ड्रग जप्त केले आहे. ड्रग विक्री करणाऱया तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
धारावी परिसरातून एक जण ड्रगचे नेटवर्क चालवत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्ष वांद्रे युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस संजय चव्हाण यांच्या पथकातील अधिकाऱयाने शनिवारी रात्री पूर्व द्रुतगती महामार्ग परिसरात सापळा रचला. फिल्मी स्टाईलने पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे एमडी जप्त केले. अटक केलेल्यामध्ये एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात धारावी, शिवाजी पार्क, डोंगरी येथे 18 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तो नेहमी सोबत शस्त्र बाळगतो. ड्रग तस्करीसाठी तो व्हाट्सअॅपचा वापर करतो. तसेच ड्रगची डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 11 या वेळात करतो. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो बस आणि टॅक्सीचा वापर करतो. ड्रगच्या गुन्ह्यात त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते, तर दुसरी कारवाई वरळी युनिटने केली. प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या पथकातील अधिकारी हे शनिवारी रात्री डॉकयार्ड रोड येथे गस्ती करीत होते. गस्ती दरम्यान पोलिसांनी नामडी ऑगस्टीन ओकारो या नायजेरियनला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एमडी आणि मेथामफेटाइन हे जप्त केले. जप्त केलेल्या ड्रगची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे. ओकारोने 2018 मध्ये पोलिसांवर हल्ला केला होता.






























































