
सामना प्रतिनिधी । राहाता
केंद्राच्या भविष्य निर्वाह निधी विभागाने राहाता पालिकेच्या सील केलेल्या बँक खात्यातून १ कोटी ५६ लाख ३० हजार आठशे रूपये परस्पर जमा करून घेतल्याची माहीती मुख्याधिकारी बी.सी.गावीत यांनी दिली. यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला असून सध्या पालिकेचा कारभार उसनवार व उधारीवर सुरू आहे.
सन २०११ सालापासून राहाता पालिकेने ठेकेदारांकडील कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्याने केंद्र शासनाच्या ई पी एल कमिशनर, नाशिक यांनी राहाता पालिकेची सर्व बँक खाती सील केली होती. पालिकेकडून पैसे भरण्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने संबधित विभागाने राहाता पालिकेच्या स्टेट बँक राहाता, युनियन बँक राहाता, साकुरी तसेच शिर्डी, या ८ बँक खात्यातील १ कोटी ५६ लाख, ३० हजार ८६८ रूपये अखेर दि ४ जानेवारी रोजी वरील खात्यातून वर्ग केले असून अजुन तीन बँक खात्यातून रक्कम वर्ग केली. मात्र त्याची माहीती मिळालेली नाही.
पालिकेच्या विविध बँक खात्यातून सर्वच पैसे काढून घेतल्याने पालिकेच्या बँक खात्यात खडखडाट झाला असून सध्या पालिकेचे सर्व आर्थिक व्यवहारही ठप्प झाल्याने दैनंदिन खर्च उसनवार व उधारीवर चालू आहेत. मागील उधारी न गेल्याने व्यापारीही हात आखडता घेत असून पेट्रोल पंप चालकांनीही पैशांचा तगादा लावल्याने पालिका प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार ठेकेदारांची बिले कशी द्यायची यातून मार्ग न निघाल्यास दैनंदिन कामकाजात अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता पालीका वर्तुळात व्यक्त होत आहे.
पालीकेने या प्रश्नी तातडीने विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती मात्र सभेत कोनताही ठोस निर्णय न झाल्याने व सभागृहाकडून प्रतिसाद न मिळाल्याने पालीका प्रशासनही शांत बसले आहे.


























































