धक्कादायक! दहावीत कमी गुण मिळण्याच्या भीतीने मुलीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये लागणार असल्यामुळे आपल्याला कमी गुण पडतील या भीतीने साक्षी पांढरे या मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गारखेडा परिसरातील विजयनगरात सोमवारी सकाळी उघडकीस आली.

गारखेडा परिसरातील विजयनगरात राहणारे अशोक पांढरे कुटुंबीयासोबत राहतात. ते गरवारे कंपनीच्या वाहनावर वाहनचालक म्हणून काम करतात. त्यांना दोन अपत्य असून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी साक्षी ही उल्कानगरीतील जयभवानी विद्यालयात शिक्षण घेत होती. तिने मार्च 2019 मध्ये दहावीची परीक्षा दिली असून परीक्षा दिल्यापासून ती तणावखालीच होती. परीक्षाचा निकाला जून मध्ये लागणार, आपल्याला कमी गुण मिळणार अशी भीती तिला वाटत होती. भीतीमुळे साक्षी खूपच तणावखाली आली होती. सोमवारी सकाळी वडील पाणी आणण्यासाठी पाण्याच्या टाकीवर गेले तर आई धुणी भांडी करण्यासाठी गेली होती तर भाऊ गच्चीवर झोपलेला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधून साक्षीने दरवाजाला ओढणी बांधून गळफास घेतला, पाणी घेऊन परत आल्यावर वडिलांना आपल्या मुलीने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला खाली उतरवले. साक्षीला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.