मुंबईत 10 टक्के पाणीकपात! गुरुवारपासून शुक्रवारी सकाळपर्यंत पाणी जपून वापरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या पांजरापूर संकुलातील पंपिंग स्टेशनमध्ये 900 मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामासाठी गुरुवार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून शुक्रवार, 27  ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांकरिता सदर उदंचन केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत संपूर्ण पश्चिम उपनगर, शहर भागातील एफ/दक्षिण परळ-लालबाग, एफ/उत्तर शीव, वडाळा, माटुंगा वगळून सर्व विभाग आणि पूर्व उपनगरातील एल विभाग कुर्ला व एन विभाग घाटकोपरमध्ये 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबई शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई 3-अ उदंचन केंद्रामध्ये 80 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा पंपिंग सेट बसविण्यापूर्वी 900 मिलीमीटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई 3-अ उदंचन केंद्र 24 तासांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी भांडुप संकुलास होणाऱया पाणीपुरवठय़ामध्ये सुमारे 10 टक्के पाणीकपात होईल. त्यामुळे या कालावधीत भांडुप संकुलद्वारे होणाऱया पश्चिम उपनगरे तसेच शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱया पाणीपुरवठय़ात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.