
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन… तसं अपरिचित नाव पण नाटय़क्षेत्रात एकपात्री प्रयोगांवर स्वतःचा ठसा उमटवलेला….
हिंदुस्थान सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, प्रख्यात गायक, संगीतकार, अभिनेते आणि नाटय़ दिग्दर्शक शेखर सेन हे 30 नोव्हेंबर रोजी आपल्या एकपात्री प्रयोगांच्या कारकीर्दीचा हजारावा प्रयोग सादर करीत आहेत. आपले संगीत क्षेत्रातील कार्य थोडेसे बाजूला ठेवून शेखर सेन यांनी संत आणि राष्ट्रपुरूषांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राचा रंगपट एकपात्री प्रयोगांच्या रूपाने उभा केला आहे. त्यांचे एकपात्री प्रयोग केवळ महाराष्ट्र अथवा देशात नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झालेले आहेत. संत आणि राष्ट्रपुरूष यांच्या सहिष्णू तत्त्वज्ञानावर हिंदुस्थानची संस्कृती उभी आहे अशी धारणा सेन यांची आहे. त्यामुळेच हे एकपात्री प्रयोग त्यांचा श्वास आणि ध्यास झाले आहेत.
‘मार्ग दावूनि गेले आधी। दयानिधी संत ते ।
येणेचि पंथे चालू जाता। न पडे गुंता कोठे काही।’
असे संत वचन आहे. याच प्रेरणेतून संत कबीर, सुरदास, तुलसीदास यांचे एकपात्री प्रयोग शेखर सेन यांनी रंगभूमीवर आणले आहेत. शेखर सेन हिंदुस्थानच्या विद्यमान सांस्कृतिक इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचे, आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. 1997 साली त्यांनी ‘तुलसी’ या एकपात्री प्रयोगाचे लेखन केले. कारण तुलसीदास यांच्या रामायणाने शेखर सेन प्रभावित झाले होते. जणू तुलसीदास यांनी स्वप्नात येऊन सेन यांना साक्षात्कार दिला की काय? असे वाटावे कारण त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात तुलसी हा एकपात्री प्रयोग लिहिला आणि धर्मयुगचे संपादक डॉ. धर्मवीर भारती यांच्यापुढे त्यांनी तुलसीचे वाचन केले. ते देखील तुलसीने प्रभावित झाले. 10 एप्रिल 1998 रोजी भाईदास सभागृहात दुपारच्या वेळी ‘तुलसी’ हा एकपात्री प्रयोग सेन यांनी सादर केला. हिंदुस्थानी संस्कृतीत तुलसीदास, कबीर, सुरदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांना अनन्यसाधारण महत्त्व असून परमार्थ साधनेबरोबरच विश्वबंधुत्त्वाचा संदेश या संतांनी दिला. त्यांच्या विचारांनी मी झपाटलो गेलो, म्हणूनच आधी ‘तुलसी’आणि नंतर ‘कबीर’ असे एकपात्री प्रयोग करू शकलो असे मत शेखर सेन यांनी व्यक्त केले.
शेखर सेन यांना 2015चा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. त्याच वर्षी ते संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष झाले आणि खैरागड विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांना प्राप्त झाली. सांस्कृतिक क्षेत्राचा विचार करता हिंदुस्थानच्या लोककलांचे जतन, संवर्धन आणि संशोधन ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदुस्थानातल्या लोककला या हिंदुस्थानी रंगभूमीचा आदीस्त्राsत आहेत ही शेखर सेन यांची भूमिका आहे. संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष या नात्याने अनेक नवीन संकल्पना शेखर सेन यांनी राबविल्या. ‘श्रेष्ठ भारत संस्कृती समागम’ या योजनेतून हिंदुस्थानातील प्रमुख शहरांमधून महोत्सव आयोजित करीत शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, नाटक, लोकनाटय़ा, शास्त्रीयनृत्य, लोकनृत्य, कठपुतली बाहुल्या अशा अनेक परंपरांचा,त्यातील श्रेष्ठ कलावंतांचा संगम त्यांनी घडविला आहे. चर्चा, परिसंवादांचे आयोजन केलेले आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसारख्या महानगरात केंद्रीत झालेली संस्कृती आता मोकळा श्वास घेऊ लागली आहे. ती गावखेडय़ापर्यंत पोचली आहे याचे श्रेय सर्वार्थाने शेखर सेन यांना जाते. कारण त्यांनी आदीवासी वाडय़ापाडय़ातील कलावंतांना राष्ट्रीय स्तरावर रंगमंच प्राप्त करून दिला आहे.
भगवान बुद्ध आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग शेखर सेन यांना खुणावत आहेत. भगवान बुद्धावरील नाटक अथवा एकपात्री प्रयोग हा संकेताला धरून नाही. ज्योतीर्मय बुद्धाला चित्रपट, रंगभूमीवर आणणे बुद्धधर्मियांना पटणारे नाही असे काही बौद्ध मित्रांनी सांगितल्यामुळे शेखर सेन यांनी बुद्धावरील संशोधन सुरू ठेवले आहे, पण एकपात्री प्रयोगाचा संकल्प मात्र स्थगित ठेवला आहे.























































