
वीज गळती रोखण्यासाठी महावितरणने धडक कारवाई सुरू केली असून महिनाभरात 879 ठिकाणी तब्बल 11 कोटी रूपयांची वीज चोरी पकडली आहे. त्यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत. महावितरण राज्यभरात दररोज सुमारे 50 दशलक्ष युनिट विजेचे वितरण केले जाते. त्यापैकी जवळपास 13 टक्के विजेची गळती होत आहे.
ती रोखण्यासाठी महावितरणने झाडाझडती सुरू केली आहे. त्यानुसार राज्यभरात सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाची 63 भरारी पथके तैनात केली आहेत. त्यांनी डिसेंबर महिन्यात विविध ठिकाणी धाडी टाकत केलेल्या कारवाईत 11 कोटी 69 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.


























































